सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यांच्या चीन सीमेवरील भारताची सुरक्षा !

 

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. चीनची माघार तात्पुरती !

‘सध्या चीनचे सैन्य लडाख-भारत सीमेवरून मागे जात आहे. असे प्रथमच होत आहे. त्यामुळे हा भारतासाठी मोठा विजय समजला पाहिजे. याचा अर्थ ‘ते परत येऊन भारताला त्रास देणार नाहीत’, असा नाही. सध्या चीन त्याच्या सैन्याचे आधुनिकीकरण करत आहे, सीमाभागात रस्ते बांधत आहे, तसेच सैन्याची मोठ्या प्रमाणात जमवाजमव करत आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, चिनी सैन्याची माघार ही तात्पुरती आहे. पुढील काळात भारताला त्रास देण्यासाठी ते नक्कीच परत येतील. चीन भारताला क्रमांक एकचा शत्रू समजत असल्याने त्याला भारताची आर्थिक प्रगती होऊ द्यायची नाही. सध्या भारत-चीन सीमा शांत आहे. याचा भारताने लाभ घेत सीमेवर असलेली सुरक्षा अधिक मजबूत केली पाहिजे. आज भारतीय सैन्य तेच करत आहे.

सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना लागून चीनची सीमा आहे. या ठिकाणी चीन भारताला त्रास देऊ शकतो, अशा बातम्या येत आहेत. सिक्कीम, भूतान आणि चीन यांचे जेथे ‘ट्राय जंक्शन’ होते, तेथेही त्यांनी घुसखोरी केली होती. त्यामुळे भारत या सीमेवर अधिक लक्ष देत आहे.

२. ईशान्य भारतातील बंडखोरी न्यून झाल्याने तेथील सैन्य भारत-चीन सीमेवर हालवणे शक्य !

ईशान्य भारताच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने ३ किंवा ४ मोठ्या समस्या आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोेेरी होत असते. भारतीय सैन्याने या बंडखोरीचे कंबरडे जवळजवळ मोडलेले आहे. ही घुसखोरी ईशान्य भारतात न्यून झाली, तरी बंगाल राज्यात अजूनही चालू आहे. बंडखोरीचे प्रमाण न्यून झाले आहे. त्यामुळे तेथील भारतीय सैन्याच्या २ ‘डिव्हिजन’ भारत-चीन सीमेवर हलवल्या जात आहेत. त्या भागात ‘आसाम रायफल’ हे अर्धसैनिक दल आहे. त्यांच्या २० बटालियन भारत-म्यानमार सीमेवर वापरल्या जात असून उर्वरित ईशान्य भारतातील बंडखोरीच्या विरोेधात वापरण्यात येतात.

३. भारत-म्यानमार सीमेवरील सुरक्षितता अतिशय महत्त्वाची !

भारत-म्यानमार सीमेची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे. ही सीमा इतर सीमांहून निराळी आहे. त्या ठिकाणी कुंपण घालता येत नाही. जुन्या कायद्यामुळे या सीमेवर रहाणार्‍या नागरिकांना त्यांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी म्यानमारमध्ये जाता येते आणि तेथील लोकांना भारतात येता येते. ही जुनी परंपरा अजूनही चालू आहे. ही परंपरा चुकीची नाही; परंतु त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात तस्करी चालते. मागील वर्षी ‘आसाम रायफल’ने याच भागातून ९०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले होते. या पार्श्‍वभूमीवर या सीमेचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे.

‘या ठिकाणी अजून १० बटालियन वाढवण्यात येतील’, असे जनरल नरवणे यांनी म्हटले आहे. दक्षिण आशियातील देश येण्या-जाण्यासाठी या भागाचा वापर करतात. ईशान्य भागातील बंडखोरी न्यून झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कार्यरत असलेले काही सैन्य चीन सीमेवर पाठवले जात आहे. तथापि या भागात परत बंडखोरी चालू झाली, तर तेथे सी.ए.पी.एफ्. (केंद्रीय सशस्त्र पोलीस दल), सी.आर्.पी.एफ्. (केंद्रीय राखीव पोलीस दल) आणि ‘इंडिया रिझर्व्ह बटालियन’चे सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. आवश्यकता पडलीच, तर बंडखोरांविरुद्ध तेथे पुन्हा सैन्य तैनात करता येईल.

४. ईशान्य भारतातील दळणवळणाच्या सोयी सीमा सुरक्षेला लाभदायी !

ईशान्य भागात दळणवळणाची साधने विकसित करण्यात येत आहेत. अरुणाचल प्रदेश हा नद्यांच्या विविध खोर्‍यांमध्ये विभागला गेला आहे. ही खोरे रस्त्यांनी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे एका खोर्‍यातून दुसर्‍या खोर्‍यात जाता येणार आहे आणि तेथे सैन्यालाही हालचाली करणे सोपे होणार आहे. त्यामुळे ईशान्य भारताची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे