वीज तोडणी करून महाराष्ट्रातील तमाम जनतेची फसवणूक करणार्‍या महाविकास आघाडीचा भाजपच्या वतीने निषेध

कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करतांना भाजप कार्यकर्ते

कोल्हापूर, १३ मार्च – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने १४ मार्च या दिवशी असलेली परीक्षा अचानक पुढे ढकलली. याचा निषेध करण्यासाठी आणि वीजदेयके न भरणार्‍यांची अचानक वीजतोडणी करणार्‍या महाविकास आघाडीचा भाजपच्या वतीने १२ मार्च या दिवशी निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे रस्ता बंद आंदोलन करून तीव्र निदर्शने करण्यात आली. यानंतर प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन सादर करण्यात आले.

या वेळी जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुति भागोजी, चंद्रकांत घाटगे, संतोष भिवटे, विजय अगरवाल, राजू मोरे, सचिन तोडकर यांसह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगली येथे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली रस्ता बंद आंदोलन आणि निदर्शने

सांगली – वरील मागणीसाठी सांगली येथे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली रस्ता बंद आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. या वेळी आमदार गाडगीळ म्हणाले, ‘‘सरकारने परीक्षेच्या अवघ्या ३ दिवस अगोदर परीक्षा रहित केल्याचे घोषित करून सर्व विद्यार्थ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले आहे. सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू आहेत. विधानसभेचे अधिवेशन झाले आहे, मग सरकारला परीक्षा घेण्यात काय अडचण आहे ?’’ या वेळी माजी उपहापौर धीरज सूर्यवंशी, दीपक माने, नगरसेवक सुब्राव मद्रासी, प्रियानंद कांबळे, राहुल माने, प्रथमेश वैद्य यांसह अन्य उपस्थित होते.