नागपूर – कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत ‘दळणवळण बंदी’ लागू करण्यात आली आहे, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी ११ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
मंत्री नितीन राऊत पुढे म्हणाले की, घरी विलगीकरणात असणार्या रुग्णांनी पूर्णवेळ घरातच असावे, यासाठी प्रशासनाद्वारे अचानक भेट दिली जाईल. या वेळी कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही. ‘दळणवळण बंदी’मध्ये कठोर संचारबंदी ठेवण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. या काळात खासगी कार्यालये बंद रहाणार असून शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला अनुमती असेल. खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा संबंधित कार्यालये मार्च अखेर पूर्ण क्षमतेने चालू रहातील. वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि अत्यावश्यक सेवा चालू रहातील.
ते म्हणाले की, ‘दळणवळण बंदी’मध्ये मद्यविक्री दुकाने बंद रहातील; मात्र त्यांची ‘ऑनलाईन’ विक्री चालू रहाणार आहे. तसेच भाजीपाला, फळे, मांस, अंडी विकत घेण्यासाठीही दुकाने चालू रहातील. डोळ्यांची रुग्णालये आणि खाद्यपदार्थांची घरपोच सेवा चालू रहातील. ओळखपत्र बाळगणे आवश्यक असणार आहे. लसीकरण चालू ठेवले जाणार असून १३१ केंद्रांवर अधिकाधिक लसीकरण करण्याची योजना आहे. या वेळी लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था यांना लसीकरणासाठी लोकांच्या प्रवासाची सोय करण्याचे आवाहन त्यांनी केले.