३ संशयितांना मुंबई येथून कह्यात घेतले
मडगाव, ९ मार्च (वार्ता.) – फातोर्डा पोलिसांनी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा २४ घंट्यांच्या आत छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दादर, मुंबई येथील शिवाजी पार्क येथून रवीनकुमार सडा (वय १८ वर्षे, रहाणारा बिहार), आदित्यकुमार खरवाल (वय १८ वर्षे, रहाणारा झारखंड) आणि आकाश घोष (वय २० वर्षे, रहाणारा झारखंड) यांना कह्यात घेतले आहे.
अंबाजी, फातोर्डा येथे ८ मार्च या दिवशी मिगेंल मिरांडा (वय ६५ वर्षे) आणि त्याची सासू कॅटरिना पिंटो (वय ८५ वर्षे) या दोन्ही वृद्धांची निर्घृणपणे हत्या केली होती. याविषयी अधिक माहिती देतांना दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंह म्हणाले, ‘‘दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा फातोर्डा पोलिसांनी २४ घंट्यांच्या आत छडा लावला आहे. संशयित झारखंड येथे जाण्याच्या सिद्धतेत असतांना त्यांना मुंबई येथून कह्यात घेण्यात आले. मयत मिरांडा यांनी वेतन न दिल्याने त्यांचा खून केल्याचे संशयितांनी प्राथमिक अन्वेषणात मान्य केले आहे.’’