कुडाळ – वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्याची केंद्र सरकारची मानसिकता नाही. याच्या विरोधात देशव्यापी मोहीम चालू असून सरकारला जशास तसे उत्तर देण्यासाठी लवकरच देशव्यापी ‘वाहतूक बंद’ (चक्का जाम) आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी ‘ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस (नवी देहली)’चे राष्ट्रीय अध्यक्ष कुलतरनसिंह अटवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर आणि बस वाहतूक महासंघाच्या वतीने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि गोवा राज्य या विभागांची विशेष बैठक येथील हॉटेल लेमनग्रास येथे झाली. त्यानंतर अटवाल यांनी पत्रकारांना माहिती दिली.
या वेळी अटवाल पुढे म्हणाले, ‘‘डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. कर, पथकर, ई-चलन आदींच्या माध्यमातून हफ्तेखोरी वाढली आहे. महामार्गावर सुविधा नाहीत. अशा अनेक समस्या वाहतूकदारांना भेडसावत आहेत. इंधनाच्या दरात वाढ केल्याने त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. दरवाढ न करण्याचा शब्द सरकारने पाळलेला नाही. पथकर आणि कर यांच्या माध्यमातून भ्रष्ट कारभार चालू आहे.’’