भ्रमणभाषमधील खासगी माहितीवर लक्ष ठेवणार्या ‘स्पाय सॉफ्टवेअर’विषयी माहिती पुढे येत असून याद्वारे २४ घंटे आणि ३६५ दिवस व्यक्तीच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाऊ शकते. भ्रमणभाषधारकांनी ‘फेस लॉक’, ‘फिंगर लॉक’, तसेच सर्व प्रकारच्या ‘अॅप’साठी ‘पासवर्ड’ घातला, तरीही ‘स्पाय सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून भ्रमणभाषमधील माहिती चोरली जाऊ शकते. केवळ ‘अॅन्ड्रॉईड’ किंवा ‘विंडोज’चे संगणक-भ्रमणसंगणक यांच्यातीलच नव्हे, तर ‘आयफोन’, ‘मॅक’ संगणक-भ्रमणसंगणक यांमधील माहितीचाही ‘स्पाय सॉफ्टवेअर’द्वारे अपवापर केला जाऊ शकतो.
भ्रमणभाषद्वारे माहिती देण्यासाठी आस्थापनांकडून मागणीनुसार पैसे आकारले जाणे
बाजारात अनेक आस्थापने व्यक्तीची माहिती देण्यासाठी मागणीनुसार पैसे आकारतात. उदा. एखाद्याच्या भ्रमणभाषमधील ‘कॉल्स’ची माहिती हवी असेल, तर ठराविक शुल्क आकारले जाते, ‘टेक्स्ट मेसेजेस’ (लघुसंदेश) वाचायचे असतील, तर वेगळे शुल्क आकारले जाते. यात ‘व्हॉईस रेकॉर्डिंग’ची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासह सामाजिक माध्यमांवरील माहिती मिळवण्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाते. व्यक्तीचे ‘जी.पी.एस्. लोकेशन’ आणि भ्रमणभाषवर काढलेली छायाचित्रे मिळवणे, भ्रमणभाषच्या परिसरात चाललेले संभाषण ऐकणे, तसेच ‘कॅमेरा’ चालू करून ‘लाईव्ह रेकॉर्डिंग’ करणे यांसारखे पर्यायही दिले जातात.
‘स्पाय सॉफ्टवेअर’पासून वाचण्यासाठी काय कराल ?
आस्थापनांकडून दावा केला जातो की, त्यांचे ‘सॉफ्टवेअर’ लक्ष्य (टार्गेट) करण्यात आलेल्या भ्रमणभाषमध्ये केवळ ३० सेकंदात ‘डाऊनलोड’ होते. त्याचा कोणता ‘आयकॉन’ही दिसत नाही. त्यामुळे भ्रमणभाष वापरणार्याला कोणताही संशय येत नाही. आयटी क्षेत्रातील तज्ञ आकाश हजारे यांनी म्हटले आहे की, आस्थापने लहान मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी हे ‘सॉफ्टवेअर’ देतात. यासह याचा गैरवापर होऊ नये, याविषयी सूचनाही दिलेल्या असतात; मात्र हा केवळ एक दिखाऊपणा असतो. भ्रमणभाष अचानक बंद होणे, भ्रमणभाषची ‘बॅटरी’ लवकर ‘डिस्चार्ज’ होणे, ‘कॉल’ चालू असतांना पाठीमागून अधिक प्रमाणात आवाज (नॉईज) येणे, इंटरनेट ‘डाटा’ चा वापर वाढणे यांसारख्या गोष्टी आढळल्यास सतर्क रहायला हवे. भ्रमणभाषची सातत्याने पडताळणी करायला हवी, तसेच आपण ‘डाऊनलोड’ न केलेले ‘अॅप’ आढळल्यास ते ‘डिलीट’ किंवा ‘अनइन्स्टॉल’ करायला हवेत.
(संदर्भ : न्यूज १८ लोकमत, १५.२.२०२१)