‘श्री गुरूंच्या कृपेने मला रामनाथी आश्रमात राहून तेलुगु ग्रंथांशी संबंधित सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. माझी क्षमता नसतांनाही केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि पू. संदीप आळशी यांचा संकल्प यांमुळे माझ्याकडूनही सेवा झाली. मला ही सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळाला, परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व आणि साधकांचे प्रेम अनुभवता आले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला जे अनुभवायला मिळाले, ते मी श्री गुरुचरणी कृतज्ञतेसह समर्पित करते.
१. तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांत लोकांकडून तेलुगु भाषेतील ग्रंथांची मागणी असल्याने पू. संदीप आळशी यांनी रामनाथी आश्रमात काही दिवस राहून ग्रंथसेवा करण्यास सांगणे
तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांत प्रतिवर्षी राष्ट्रीय स्तरावरील ग्रंथ प्रदर्शन (हैद्राबाद बूक फेअर आणि विजयवाडा बूक फेअर) भरवले जाते. त्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथांचा वितरणकक्ष लावला जातो. या ग्रंथप्रदर्शनात तेलुगु भाषिक लोक अधिक संख्येने येत असल्याने तेलुगु भाषेतील ग्रंथांची आवश्यकता असते. मागील काही वर्षांत नवीन तेलुगु ग्रंथ उपलब्ध होऊ शकला नाही. ग्रंथप्रदर्शनस्थळी येणार्या व्यक्ती हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील ग्रंथ पाहून ‘एवढे चांगले ग्रंथ तेलुगु भाषेत मिळाले असते, तर चांगले झाले असते’, असे सांगत होत्या. या वितरणकक्षावर प्रतिवर्षी येणार्या व्यक्ती ‘नवीन ग्रंथ आला आहे का ?’, असे विचारत होत्या. मी याविषयी पू. संदीप आळशी यांना सांगितल्यावर त्यांनी ‘आश्रमात काही दिवस राहून ग्रंथांशी संबंधित सेवा करावी’, असे सांगितले.
२. रामनाथी आश्रमात ग्रंथांशी संबंधित सेवा करण्यासाठी येणे
२ अ. ग्रंथांच्या पुनर्मुद्रणाची सेवा करतांना मनाचा संघर्ष होणे आणि परात्पर गुरुदेवांना आत्मनिवेदन केल्यावर त्यांनी साधनेचा दृष्टीकोन सुचवणे : मी सेवेसाठी रामनाथी आश्रमात आले असतांना ४ नवीन ग्रंथ करण्याचे नियोजन होते; परंतु त्याच वेळी मला समजले, ‘८ लघुग्रंथांचा साठा अल्प असल्यामुळे त्यांचे पुनर्मुद्रण करायचे आहे.’ मला दोन दिवसांनंतर समजले, ‘४ मोठ्या ग्रंथांचेही पुनर्मुद्रण करायचे आहे.’ त्या वेळी मनाचा थोडा संघर्ष झाला की, ग्रंथांच्या पुनर्मुद्रणाची प्रक्रिया करण्यात माझा वेळ जाईल. त्यामुळे नवीन ग्रंथ सिद्ध होऊ शकणार नाही. मला ‘कसे करायचे ?’, हे समजत नव्हते. तेव्हा मी परात्पर गुरुदेवांना आत्मनिवेदन केल्यावर परात्पर गुरुदेवांनी मला साधनेचा दृष्टीकोन सुचवला.
२ आ. ईश्वरेच्छा स्वीकारल्यामुळे फलनिष्पत्ति वाढणे आणि आनंद मिळणे : ‘आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती समष्टीसाठी आवश्यक आहे आणि ही ईश्वराचीच इच्छा आहे. ‘नवे ग्रंथ करायचे आहेत’, ही माझी स्वेच्छा आहे’, हे विचार स्वीकारल्यामुळे माझी साधना होणार आहे’, या विचाराने माझे मन शांत झाले. ‘माझी क्षमता नसतांनाही जी समयमर्यादा ठरवली होती, त्या वेळेत पुनर्मुद्रण आणि नवीन ग्रंथ, अशी एकूण १६ ग्रंथांची सेवा पूर्ण झाली’, अशी मला अनुभूती आली. यातून ‘ईश्वराची इच्छा स्वीकारल्यामुळे सेवेची फलनिष्पत्ती वाढते आणि संघर्ष न होता सेवा होऊन आनंद मिळतो’, हे लक्षात आले.
२ इ. शारीरिक त्रास वाढून नियोजनानुसार कृती होत नसल्याने शरणागतभावाने प्रार्थना करणे : ‘कोणते ग्रंथ केव्हा पूर्ण करायचे आहेत ?’, याचे नियोजन करून घेत असतांना माझे डोकेदुखीचे प्रमाण पुष्कळ वाढत होते. त्या वेळी मी संपूर्ण दिवस काहीच करू शकत नव्हते. नंतर मी संतांना विचारून नामजपादी उपाय केल्याने माझा त्रास उणावत असे; मात्र दोन दिवसांनंतर पुन्हा त्रास व्हायचा. त्यासाठी औषध घेणे आणि नामजपादी उपाय करणे, असे चालू होते. यांत वेळ गेल्यामुळे जसे नियोजन केले होते, तसे प्रत्यक्षात होत नव्हते. तेव्हा परात्पर गुरुदेवांच्या चरणी ‘मला या चैतन्यमय ग्रंथांची सेवा अपेक्षित वेळेत पूर्ण करणे शक्य नाही. आपणच माझ्याकडून ही सेवा करवून घ्यावी’, अशी शरणागतभावाने प्रार्थना होत होती.
२ ई. ग्रंथसेवेत असणारी सहसाधिका पुरेसा वेळ देऊ शकत नसणे; मात्र गुरुदेवांना शरण गेल्याने ग्रंथसेवा वेळेत पूर्ण होऊ शकणे : तेलुगु ग्रंथांच्या सेवेत माझ्यासमवेत कु. सुगुणा गुज्जेटी ही साधिका होती. आम्ही सेवेला आरंभ केल्यावर तिच्या हाताचे शस्त्रकर्म करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. तिला रुग्णालयात जावे लागत असल्याने तिला फारशी सेवा करता येत नव्हती; परंतु या परिस्थितीचा सेवेवर काहीच परिणाम झाला नाही. आम्ही जसे नियोजन केले होते, त्याप्रमाणेच ग्रंथांची सेवा पूर्ण झाली. हे केवळ परात्पर गुरुदेवांच्या चरणी शरण जाण्यामुळे साध्य होऊ शकले. ‘आम्ही ही सेवा करू शकू’, अशी स्थिती नव्हती. ‘माझ्यात शरणागतीची स्थिती निर्माण करण्याची भगवंताची ही लीला अनुभवायला मिळाली’, त्यासाठी मी त्याच्याप्रती कृतज्ञ आहे.
२ उ. रामनाथी आश्रमात होत असलेल्या यज्ञांतील चैतन्यामुळे सेवा करण्याचा उत्साह वाढणे : आम्हाला ग्रंथसेवा समयमर्यादेत पूर्ण करायची होती. त्यामुळे माझ्या मनात अधिक वेळ त्याचेच विचार असायचे. माझे मन कार्याच्या मागेच धावत होते. भगवंताच्या कृपेने त्या वेळी रामनाथी आश्रमात नवरात्र आणि दिवाळी यानिमित्त यज्ञ अन् पूजा होत होत्या. ते यज्ञ आणि पूजा एवढे भावपूर्ण होत होते की, माझे मन पूर्णपणे भावमय होत असे. मी या यज्ञांच्या वेळी देवतांचे अस्तित्व अनुभवायचे. ते वातावरण अवर्णनीय होते. ‘आम्ही साधक किती भाग्यवान आहोत’, अशा कृतज्ञतेच्या विचाराने माझे मन भरून येत असे. यज्ञ आणि पूजा यांमुळे मला पुष्कळ प्रमाणात चैतन्य अन् सात्त्विकता मिळत होती. त्यामुळे मनात साधनेचे विचार वाढणे, परात्पर गुरुदेवांचे स्मरण होणे, सेवा करण्याचा उत्साह वाढणे, ऊर्जा मिळणे, असे अनुभवायला आले. यामुळे ग्रंथसेवा साधनेच्या दृष्टीने करण्यासाठी साहाय्य झाले.
२ ऊ. ग्रंथसेवेव्यतिरिक्त अन्य सेवाही करता येऊन त्या सेवांतूनही आनंद मिळणे : मी आश्रमात आले असतांना ‘४ ग्रंथांची सेवा करायची आहे’, हाच विचार माझ्या मनात होता. मी आश्रमात आल्यानंतर ‘तेलुगु अँड्रॉइड सनातन पंचांगाची सेवा आणि उत्सवांच्या विषयांचे लेख सिद्ध करून ते संकेतस्थळावर अपलोड करायचे, या सेवाही करायच्या आहेत’, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा मनात ‘या दोन्ही सेवा केल्यामुळे समष्टीला मोठ्या प्रमाणात धर्मशिक्षण मिळेल. अशा सेवा या वेळी केल्या नाहीत, तर मोठी समष्टी सेवा करण्याची संधी हातातून निसटून जाईल. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने सेवा मिळाल्या आहेत, तर तेच त्या करवून घेतील’, असा विचार येऊन या सेवा करण्यासाठी मन सकारात्मक राहिले. त्यामुळे मला या सेवांतून पुष्कळ आनंद मिळाला. ‘या सेवा कशा झाल्या ?’, हे मला समजलेही नाही. आधीच्या वर्षांच्या तुलनेत या वर्षी अत्यल्प वेळेत ही सेवा पूर्ण झाली. परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी संकुचित विचारातून बाहेर येऊ शकले. यातून मला परात्पर गुुरुदेवांच्या संकल्पाची प्रचीती आली.
२ ए. ग्रंथांतील चैतन्यामुळे परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवून ‘आणखी सेवा करूया’, असे वाटणे : मी ग्रंथाचा विषय वाचतांना मला सतत गुरुदेवांचे स्मरण होत होते. ‘किती शुद्ध शास्त्र आहे आणि गुरुदेवांनी सरळ साधनेचा मार्ग सांगितला आहे अन् किती सुलभतेने अध्यात्म समजावून सांगितले आहे’, या विचाराने मी अंतर्मुख व्हायचे. मी सेवेत एवढे मग्न असायचे की, महाप्रसादाची उद्घोषणा ऐकू आल्यावरच मला वेळेची जाणीव होत असे आणि ‘एवढा वेळ मी परात्पर गुरुदेवांसह होते’, असे मला वाटायचे. मी या सेवेत परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवत असे. मला सेवा करतांना अकस्मात् आतून आनंद व्हायचा. माझ्या मनात ‘आणखी सेवा करूया’, असे विचार यायचे. मला ‘परात्पर गुरुदेवांसाठी काय करू ?’, असे होत असे. ‘त्या स्थितीतून बाहेर येऊ नये’, असे मला वाटायचे. हे सर्व ‘परात्पर गुरुदेवांच्या ग्रंथांमध्ये असलेल्या चैतन्यामुळे साध्य झाले’, असे माझ्या लक्षात यायचे.
३. कृतज्ञता
परात्पर गुरुदेव, आपण या अहंयुक्त आणि बुद्धीजीवी जिवाला या अनुभूती दिल्या. त्यामुळे मी धन्य झाले आहे. आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
४. परात्पर गुरुदेवांना अपेक्षित असे घडण्यासाठी केलेली प्रार्थना !
‘हे गुरुमाऊली, या क्षुद्र जिवाची पात्रता नसतांना आपण मला साधना शिकवली आणि सेवा दिली अन् त्यासह भरभरून आनंदही देत आहात. त्याविषयी आपल्या चरणी किती आणि कशी कृतज्ञता व्यक्त करू ? आपण जे देऊ इच्छिता, ते घेण्यात आणि अनुभव करण्यात, आपल्या साधनेची शिकवण प्रत्येक वेळी कृतीत आणण्यात मी फार अल्प पडते, तरीही आपण मला आनंद देत आहात. आपण तर प्रत्येक क्षणी माझ्या समवेत असता आणि साधनेच्या दिशेने मला घेऊन जाता. ‘परात्पर गुरुदेव, आपल्याला जशी अपेक्षित विनुता आहे, तसे मला होता येऊ दे. आपणच या जिवाचे प्राण आहात. आपणच माझ्यासाठी सर्वस्व आहात. आपली कृपा प्रत्येक वेळी प्राप्त करण्याचे प्रयत्न आपणच माझ्याकडून करवून घ्या’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सदैव आपल्या चरणी राहू इच्छिणारी, सौ. विनुता शेट्टी, भाग्यनगर (१.१.२०१९)