राज्यातील महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची ५०० कोटी रुपयांची अनामत रक्कम पडून !

विद्यार्थ्यांचे पैसे त्यांना परत केले जावेत, यासाठी पत्रक काढूनही त्यांना अनामत रक्कम वेळेत न मिळणे हा विद्यार्थ्यांवरील अन्यायच आहे. यासाठी उत्तरदायी कोण ? विद्यार्थ्यांना पैसे मिळावेत, यासाठी कार्यपद्धत घालणे आवश्यक आहे.

पुणे – उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतांना शैक्षणिक शुल्कासह वसतीगृह, भोजनगृह, शैक्षणिक साहित्य, ग्रंथालय आणि इतर कारणांसाठी ५०० रुपयांपासून पुढे रक्कम घेतली जाते. काही रक्कम ही अनामत शुल्क म्हणून भरून घेतली जाते. विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम विद्यार्थ्यांना परत केली जाते; पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी ती रक्कम परत मिळावी यासाठी पत्रव्यवहार करत नसल्याने, तसेच विद्यार्थ्यांची उदासीनता, काही विद्यार्थ्यांना तशी माहिती नसणे, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयाकडे पाठ फिरवणे आदी कारणांमुळे महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांत अनुमाने ५०० कोटी रुपये पडून असल्याची माहिती पुढे येत आहे.

कुलगुरु डॉ. एन्.एस्. उमराणी म्हणाले, ‘‘या रक्कमेविषयी महाविद्यालयांमध्ये नोटीस, माहिती पुस्तकात माहिती दिलेली असते. विद्यार्थ्यांनी ठराविक मुदतीत पैसे न नेल्यास ती रक्कम विकासनिधीत वापरली जाते. विद्यार्थ्यांचे पैसे परत करण्याचे यापूर्वी विद्यापिठाने परिपत्रक काढलेले आहे.’’

एका प्राचार्यांनी सांगितले की, महाविद्यालयाचे प्रत्येक वर्षी लेखा परीक्षण केले जाते. त्यामध्ये ही रक्कम दाखवली जाते; पण ती रक्कम परत नेली जात नसल्याने आणि  ‘क्लेम डिपॉझिट’ म्हणून ५ वर्षांनंतर ती रक्कम ‘डिपॉझिट’ केली जाते.