मुंबई, २५ फेब्रुवारी – पत्नी म्हणजे एखादी मालमत्ता किंवा वस्तू नाही. घरातील सर्व कामांची अपेक्षा पत्नीकडून करणे चूक आहे. गृहिणीकडूनच घरातील सर्व प्रकारच्या कामांची अपेक्षा केली जाते. ही पती-पत्नीच्या नात्यांमधील असमानता आहे. कोणतेही लग्न हे समानतेच्या तत्त्वावर आधारलेले आहे. त्यामुळे गृहिणीलाच घरातील सर्व कामे करण्यासाठी उत्तरदायी ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. चहा द्यायला नकार दिला म्हणून हातोड्याने पत्नीची हत्या करणार्या एका प्रकरणावरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला.
या वेळी न्यायालयाने म्हटले की, अनेकदा महिलांची सामाजिक परिस्थितीही याला कारणीभूत असते. त्यामुळे महिला स्वत:ला जोडीदाराकडे स्वाधीन करतात. त्यामुळे पुरुषांना आपण प्रमुख असून पत्नी ही आपली मालमत्ता असल्याचा भ्रम निर्माण होतो.
या प्रकरणात जोडप्याच्या सहा वर्षांच्या मुलीसमोरच हा सर्व प्रकार घडला होता. त्या चिमुकलीने वडिलांच्या विरोधात साक्ष दिली.