सौ. कविता बेलसरे यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
‘आमचे लग्न पूर्वीच्या काळाच्या मानाने उशिरा झाले. लग्नानंतर मूल होत नसल्याने ‘देवाचे करणे, पोथी वाचणे, कुणी काही सांगतील ते उपाय करणे’ इत्यादी सर्व चालू होते. लग्नानंतर २ वर्षांनी आमची मोठी मुलगी कविता हिचा जन्म झाला.
१. बालपण
१ अ. कुशाग्र बुद्धीमत्ता असल्याने उत्तम कविता, तसेच लिखाण करणे : ‘कविताची बुद्धी तल्लख आणि तेजस्वी आहे. लहानपणापासूनच तिने तिच्या ‘कविता’ या नावाप्रमाणे कविता केल्या. कुठल्याही विषयावर ती शीघ्रतेने लिखाण करते.’
– सौ. सुलभा कुलकर्णी (आई), सांगली
१ आ. शालेय स्पर्धांमधे भाग घेणे : ‘तिने शाळेतील सर्व स्पर्धांमधे भाग घेऊन बरीच पारितोषिके मिळवली. त्यामुळे शाळेत, तसेच शेजारी-पाजारी यांची ती लाडकी होती.
१ इ. मायेची आसक्ती नसणे : कविताचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण जत (जि. सांगली) येथे झाले. खेडेगावात राहिल्याने असेल, तिला कपडे किंवा नटणे यांची हौस लहानपणापासूनच अल्प होती. तिचे बालपण आहे त्या परिस्थितीत समाधानाने गेले.’
– श्री. दत्तात्रेय कुलकर्णी (वडील), सांगली
१ ई. अभ्यासू वृत्ती असल्याने शाळेत पहिला क्रमांक मिळवणे : ‘आम्ही सांगलीला आल्यानंतर पाचवीनंतरचे तिचे शिक्षण सांगलीला झाले. शहरात आल्यानंतरही तिने कधी हट्ट केला नाही. एका खोलीत अभ्यास करून तिने शाळेतला पहिला क्रमांक कधीही सोडला नाही. तिच्या मामेभावंडांची जुनी पुस्तके किंवा कपडे वापरतांना तिने कधीही तक्रार केली नाही.
१ उ. समाधानी वृत्ती आणि समजूतदार स्वभाव यांमुळे लहान बहिणींसह आनंदाने रहाणे : ती लहानपणापासून तिच्या दोन्ही लहान बहिणींना आनंदाने सांभाळायची. या तिघी बहिणी कधीही भांडल्याचे आम्ही पाहिले नाही. त्यांनी कधीही कपडे किंवा खाणे यांसाठी हट्ट केला नाही.’
– सौ. सुलभा कुलकर्णी आणि श्री. दत्तात्रेय कुलकर्णी
२. वडिलांच्या शस्त्रकर्माच्या वेळी दायित्व घेऊन वागणे
‘वर्ष २००० मध्ये माझ्या हृदयाच्या शस्त्रकर्मासाठी मला पुण्याला जावे लागले. त्या वेळी ती महाविद्यालयात होती. लहान वय असूनही तिने आईसह पुण्यातील रुग्णालयात राहून माझी सेवा केली आणि आपल्या आईला आधार दिला.’ – श्री. दत्तात्रेय कुलकर्णी
३. अनावश्यक व्यय आणि अयोग्य वागणे आवडत नसणे
‘तिचे महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी तिने स्वतःच प्रयत्न केले. वर्ष २००६ मध्ये नोकरी लागल्यानंतर तिला तेथील अयोग्य गोष्टी आणि वागणे आवडायचे नाही. त्यामुळे तेथील अधिकारी आणि सहकारी यांच्याशी तिचे पटायचे नाही. नोकरी लागली; म्हणून तिने कधी अनावश्यक व्यय करणे, बाहेर खाणे किंवा कपडे घेणे इत्यादी कृती केल्या नाहीत.
४. कविताने आतापर्यंत केलेल्या विविध सेवा
‘वर्ष १९९७-९८ मध्ये आम्ही सर्व जण साधना करू लागलो. नंतर १ – २ वर्षांतच ती महाविद्यालयीन शिक्षण घेत मिळेल ती सेवा करू लागली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने तिच्यात मिळेल ती सेवा शिकण्याची वृत्ती निर्माण झाली. त्यामुळे आरंभीच्या काळात ‘प्रसारफेरी, क्षात्रगीते म्हणणे, प्रशिक्षण, प्रथमोपचार, जिल्हास्तरीय सेवा, सूत्रसंचालन, पथनाट्य, प्रवचन, टंकलेखन, संकलन, वार्ताहर सेवा’, अशा अनेक प्रकारच्या सेवा प.पू. गुरुमाऊलींनी तिच्याकडून करवून घेतल्या.
सेवेतही ती ‘आज्ञापालन, कार्यपद्धतीचे पालन करणे, परिपूर्ण आणि भावपूर्ण, तसेच समयमर्यादेत सेवा पूर्ण करणे’, असे करायची. आम्हा सर्वांचीच साधना होण्यासाठी ती सतत आम्हा सर्वांना साहाय्य करते.
५. स्थिर राहून परिस्थिती स्वीकारणे
तिच्या विवाहाविषयी चर्चा चालू झाल्यावर ‘मी सनातन संस्थेच्या साधकाशी लग्न करणार’ या मतावर ती ठाम होती; पण तिला मनासारखे स्थळ मिळत नव्हते. त्यामुळे तिच्या आधी तिच्या लहान बहिणींची लग्ने झाली. ते तिने आनंदाने स्वीकारले. त्याविषयी तिने कधीही राग, द्वेष किंवा मत्सर केला नाही. दोन्ही बहिणींच्या लग्नात तिने पुढाकार घेऊन दायित्वाने सर्व कार्य पूर्णत्वाला नेले.
६. आई-वडिलांची काळजी घेणे
वर्ष २०१७ मध्ये तिचा विवाह झाल्यानंतर आम्ही दोघेच सांगलीत रहाणार असल्याने ‘या वयात आम्हाला त्रास व्हायला नको’, यासाठी तिने सासरी जाण्यापूर्वी घरात अनेक सोयी करून घेतल्या. ती सतत आमचा विचार करते. प्रत्येक गोष्टीत लक्ष देऊन ती आमची काळजी घेते. तिला आमच्या प्रकृतीची काळजी वाटत असल्यामुळे ती आम्हाला शारीरिक, आर्थिक आणि आध्यात्मिक आधार देते. ही देवाची पुष्कळ मोठी कृपा आहे. याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी थोडीच आहे.
अशी सर्व गुणांनी युक्त सद्गुणी कन्या दिल्याविषयी आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘तिला आपल्या चरणांजवळ ठेवून आपल्याला अपेक्षित अशी तिची सेवा आणि साधना करवून घ्यावी अन् तिची पुढील प्रगती लवकर करवून घ्यावी’, हीच शरणागतीने प्रार्थना आहे.’
– श्री. दत्तात्रेय आणि सौ. सुलभा कुलकर्णी, सांगली
(सौ. कविता बेलसरे यांचे आई-वडील) (५.२.२०२१)
स्वभावदोष-अहं निर्मूलन करून मनाला घडवायचे आहे ।‘पुणे येथील साधिका सौ. मनीषा पाठक यांनी ‘ऑनलाईन’ सत्संगात ‘आपले ओझे न्यून करायचे आहे आणि सर्व जुने प्रसंग अन् पूर्वग्रह काढायचे आहेत’, असे सांगितल्यावर मला पुढील कविता सुचली. मनावरील मळभ काढायचे आहे । गुरूंना शरण जायचे आहे ॥ १ ॥ भूतकाळाचे प्रसंग विसरायचे आहेत । वर्तमानकाळात निरंतर रहायचे आहे ॥ २ ॥ आपुले आपण हसायचे आहे । देवाचे लाडके बनायचे आहे ॥ ३ ॥ जन्मोजन्मीचे संस्कार घालवायचे आहेत । स्वभावदोष-अहं निर्मूलन करून मनाला घडवायचे आहे ॥ ४ ॥ खरा मी कोण आहे, हे शोधायचे आहे । जिवाला शिवाशी भेटवायचे आहे ॥ ५ ॥ अस्तित्व आपुले विसरायचे आहे । गुरुचरणी एकरूप व्हायचे आहे ॥ ६ ॥’ – सौ. कविता बेलसरे, पुणे (मे २०२०) |