वाढदिवसाच्या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. वैष्णवी वेसणेकर यांनी अनुभवलेले भावक्षण !

कु. वैष्णवी वेसणेकर

​‘३१.१.२०२१ या दिवशी माझा वाढदिवस होता. (कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नेहमीप्रमाणे सर्वांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यासाठी परिस्थिती नव्हती.) ईश्‍वर आणि गुरुमाऊली यांच्या प्रेमाला कोणतीच मर्यादा नसते. ‘त्यांचे प्रेम अमर्याद असून सर्वकाही विसरायला लावणारे असते’, हे मी अनुभवले. त्यातील काही सूत्रे येथे दिली आहेत.

१. वाढदिवसाच्या दिवशी स्थुलातून कुणाला न भेटताही साधकांनी शुभेच्छा देणे आणि संत बनण्याचे आध्यात्मिक ध्येय साध्य करण्यासाठी आशीर्वाद देणे

अनेक साधकांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर लघुसंदेशाद्वारे, तर काही साधकांनी भ्रमणभाष करून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि संत बनण्याचे आध्यात्मिक ध्येय साध्य करण्यासाठी भरभरून आशीर्वादही दिले. मी त्या माध्यमातून गुरुदेवांची भरभरून प्रीती अनुभवली. ‘मी स्थुलातून कुणाला भेटलेच नाही’, असे मला मुळीच वाटले नाही. सर्वांनी दिलेल्या प्रेमामुळे ‘मी त्यांच्या समवेतच आहे’, असे वाटून मला आनंद होत होता.

२. अलगीकरणाच्या कालावधीत साजरा झालेला वाढदिवस ‘अलग’ आणि अविस्मरणीय’ होऊन आनंद मिळणे

​या वर्षी कोरोना महामारीच्या कालावधीत अलगीकरणात साजरा झालेला माझा वाढदिवस खरेच ‘अलग’ आणि अविस्मरणीय होता. साजरा झालेला माझा वाढदिवस मला स्थळ-काळ आणि स्थूल-सूक्ष्म यांच्या पलीकडे नेणारा होता. माझा साजरा झालेला या वर्षीचा वाढदिवस स्थुलातून सूक्ष्माकडे नेणारा आणि अनेकातून एकात नेणारा होता. या वर्षी माझा आपत्कालीन स्थितीतील वाढदिवस होता, तरीही मी आनंद मात्र भरभरून अनुभवला.

३. वाढदिवसानिमित्त अनुभवलेले भावविश्‍व !

३ अ. वाढदिवसानिमित्त देवतांनी सूक्ष्मातून कृपावर्षाव करणे : मला वाढदिवसाच्या दिवशी माझ्यावर कृपावर्षाव करणार्‍या देवता सातत्याने दिसत होत्या. मला मधून मधून थकवा जाणवल्यास ‘त्या देवता माझ्यावर कृपावर्षाव करत आहेत’, असे जाणवून मला पुन्हा उत्साह वाटत होता.

३ आ. महालक्ष्मी किरणोत्सवाचे छायाचित्र पाहून मन देवीच्या चरणी सूर्यनारायणासम झुकणे आणि आपत्काळासाठी बळ मिळण्यासाठी प्रार्थना होणे : माझ्या ‘वाढदिवसाच्या दिवशी महालक्ष्मी किरणोत्सव आहे’, हे मी विसरले होते. रात्री देवीच्या किरणोत्सवाचे छायाचित्र पहाताक्षणी माझी भावजागृती झाली. किरणोत्सवाच्या दिवशी सूर्यनारायण देवीच्या चरणांना आधी स्पर्श करतो. नंतर तो देवीच्या हृदयाला आणि नंतर मुखमंडलासह तिचे संपूर्ण रूपच उजळवून टाकतो. हे छायाचित्र पहाताक्षणी माझे मन देवीच्या चरणी सूर्यनारायणासम झुकले. माझी जगदंबेच्या चरणी संपूर्ण लीन होऊन प्रार्थना झाली, ‘देवी, मला अशीच तुझ्या चरणांची ओढ लागू दे. माझे मन सतत तुझ्या चरणी झुकू दे आणि तुझ्या चरणी लीन होता होता मनात तुझी सुंदर मूर्ती वसू दे. माते, तूच मला बळ दे. माते, आपत्काळाचा सामना धैर्याने करण्यासाठी मला आध्यात्मिक ऊर्जा दे.’

४. वाढदिवसानिमित्त देवाच्या कृपेने ठरवलेले ध्येय !

अ. परिस्थिती स्वीकारणे, शिकणे, अडचणी मोकळेपणाने मांडणे, स्वतःच्या स्तरावर करत न रहाता इतरांचे साहाय्य घेऊन सेवा करणे.

आ. प्रसंग घडला, काही अडचणी आल्या की, मला ते स्वीकारता येत नाही. मला ताण येतो. माझ्या मनात टोकाचे विचार येतात आणि मला सेवा करावीशी वाटत नाही. मला काही वेळा रडू येते. मी देवाला या सर्वांवर प्रयत्न करण्याचे बळ मागितले.

इ. प्रत्येक प्रसंगाला सामोरे जातांना देवाला शरण जाणे, त्याचा धावा करणे, त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवणे. प्रसंगातून शिकणे आणि त्यातील देव अनुभवणे अन् झोकून देऊन साधना करणे.

​मला ही ध्येये गाठण्यासाठी देवाचे आशीर्वाद आहेतच. ‘सर्व साधकांनीही आशीर्वाद द्यावेत आणि साधनेत साहाय्य करावे’, ही प्रार्थना !’

– कु. वैष्णवी वेसणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२१)

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

कु. वैष्णवी वेसणेकर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची अनुभवलेली प्रीती !

​‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला वाढदिवसानिमित्त खाऊ पाठवला. त्या दिवशी रात्री त्यांनी मला पुन्हा एकदा खाऊ पाठवला. त्यांनी दिलेल्या खाऊच्या पाकिटावर लिहिले होते,

‘कु. वैष्णवी वेसणेकर हिला वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा खाऊ ! (एकदा समाधान झाले नाही; म्हणून पुन्हा !)’

मी हे वाचल्यावर ‘सर्व संत, सद्गुरु आपल्यावर किती भरभरून प्रेम करतात’, असे वाटून माझी भावजागृती झाली. पूर्वी मी गुरुदेवांच्या खोलीची स्वच्छता करत होते. मला त्या वेळी वाढदिवसाच्या दिवशी गुरुदेवांच्या अनुभवलेल्या प्रीतीचे स्मरण झाले. प.पू. गुरुदेवांनाही त्या दिवशी मला ‘काय आणि किती देऊ !’, असे झाले होते. ते मला वेगवेगळा खाऊ देत होते, तरी त्यांचे मनच भरत नव्हते. मी त्या भावक्षण आठवणींमध्ये रमून गेले. ‘सर्व संतही गुरूंसम आहेत’, हे मला अनुभवायला आलेे. तेव्हा देवाने मला पुढील कविता सुचवली.

​मी सद्गुरु गाडगीळकाकांना लिहिले, ‘एकदा समाधान झाले नाही, म्हणून पुन्हा एकदा तुमच्या कोमल चरणांवर डोके ठेवून नमस्कार करते.’

अशी ही पुनःपुन्हाची भावशृंखला । तुम्ही खाऊ पाठवला पुन्हा ।

मी कृतज्ञ झाले पुन्हा । वंदन केले पुन्हा ॥ १ ॥

पुनःपुन्हाची शृंखला । येत रहावी पुनःपुन्हा ॥ २ ॥

आम्ही नमन करावे पुनःपुन्हा । तुम्ही कृपाशीष द्यावे पुनःपुन्हा ॥ ३ ॥

आम्ही समर्पित व्हावे पुनःपुन्हा । तुम्ही भार उचलावा पुनःपुन्हा ॥ ४ ॥

आम्ही शरण जावे पुनःपुन्हा । तुम्ही उद्धार करावा पुनःपुन्हा ॥ ५ ॥

गुरुमाऊलीची कृपा अनुभवण्या ।

संत अन् सद्गुरु यांचा सहवास अनुभवण्या ।

जन्म व्हावा पुनःपुन्हा ॥ ६ ॥

अशी ही पुनःपुन्हाची भावशृंखला ।

येत राहावी पुनःपुन्हा ॥ ७ ॥

२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला आशीर्वादपर पुढील कविता पाठवली 

तू असेच लिहीत जावे पुनःपुन्हा । सुंदर आणि अप्रतिम ।

तू असेच लिहीत जावे पुनःपुन्हा ।

आम्ही ते भावविश्‍व अनुभवावे पुनःपुन्हा ॥ १ ॥

यासाठीच जन्म झाला तुझा आणि आम्हा साधकांचा ।

तुझ्या कृपेने भक्तीभावात डुंबण्या पुन:पुन्हा ।

तुझ्यामुळे ही लेखणी स्फुरली आणि असेच

ज्ञानगंगेत डुंबावे मी पुनःपुन्हा ॥ २ ॥

३. सद्गुरु गाडगीळकाकांच्यातील विनम्रता पाहून मला भरून आले. ‘त्यांना काय उत्तर द्यावे ?’, ते मला कळेनाच. मी त्यांना दोनच ओळी लिहून पाठवल्या.

लीन होते तव चरणी पुनःपुन्हा ।

किती कृतज्ञता अन् नम्रता तुमची ।

दावी देव मज पुनःपुन्हा ॥ १ ॥

निर्माण होण्या ते माझ्यात ।

लीन होते तव चरणी पुनःपुन्हा ॥ २ ॥

– कु. वैष्णवी वेसणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२१)

कु. वैष्णवी वेसणेकर यांच्या नावाचा श्री. महावीर श्रीश्रीमाळ यांना सुचलेला भावार्थ !

वै – वैष्णवांची मांदियाळी विष्णुचरणी लीन करण्यात भाव-भक्तीने हरखून जाणारी ।

ष्ण – विष्णुस्वरूप गुरुमाऊलींच्या अनुसंधानात स्वत:सह अन्यांना भिजवणारी ।

वी – वीणे नाते साधकांशी भाव-तत्त्वनिष्ठेतेचे, लढे त्रासाशी चिकाटीने ।

वे – वेची क्षणमोती सद्गुरु अन् परात्पर गुरु यांच्या अनमोल सत्संगातील ।

स – सकारात्मकता वाढवूनी, झटक नकारात्मकता सजगतेने ।

णे – नेण्या पैलतीरी तव सवे आम्हा वाढव गुण ते नेतृत्वाचे ।

कर – कर जुळवनी प्रार्थितो गुरुकृपा बरसावी तव मस्तकी निरंतर ॥

​कु. वैष्णवी वेसणेकर यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा !

– श्री. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२१)

कु. वैष्णवी वेसणेकर यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रार्थना !

‘गुरुमाऊली, तुम्ही साधकांच्या माध्यमातून करत असलेल्या प्रीतीमुळे मी पूर्णपणे तुमचीच होऊन गेले आहे. तुम्ही मला आपलेसे करून घेतल्याविषयी कोटीशः कृतज्ञता !

​‘गुरुमाऊली, सर्व साधक मला ‘विष्णुप्रिया वैष्णवी’ म्हणतात; पण खर्‍या अर्थाने तुम्हाला प्रिय बनण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न करवून घ्या. सर्व साधकांच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या भरभरून आशीर्वादाचे बळ घेऊन मला साधनेच्या पुढील मार्गावर तुमच्या साहाय्याने जलद गतीने मार्गक्रमण करता येऊ दे. तुमच्या समष्टी रूपाशी मला एकरूप होता येऊ दे’, अशी तुमच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना !’

– तुमची भावकन्या बनण्यासाठी व्याकुळ,

कु. वैष्णवी वेसणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२१)