मुंबई – कोरोनाच्या काळात आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल, तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासन यांनी तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात नाव घेण्यात येत असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ फेब्रुवारी या दिवशी कारवाई करण्याची सूचना दिली आहे.
याविषयी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘दळणवळण बंदीच्या काळात नागरिकांनी सण-उत्सव शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळेही नियमांचे पालन करत होती आणि आताही ‘पुनश्च हरि ॐ’ मध्ये कार्यपद्धतींचे पालन करणे आपले दायित्व आहे. कोरोनाची दुसरी लाट येणे हा आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन संकटाचा सामना करण्यासाठी सिद्ध आहेच; पण नागरिक म्हणून प्रत्येकाचे वैयक्तिक दायित्वही आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.’’