शिर्डी येथे श्री साईदर्शनासाठी नवीन नियमावली, सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंतच दर्शन

आज होणारा ‘पालखी सोहळा’ रहित

शिर्डी (जिल्हा नगर) – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी नवीन नियमावली घोषित करण्यात आली आहे. सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंतच भाविकांना श्री साईचे दर्शन घेता येणार आहे. पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भक्तांना उपस्थित रहाता येणार नाही. गुरुवार आणि सलग सुट्टीच्या दिवशी भक्तांना ‘ऑनलाईन’ पास बंधनकारक आहे, तर २५ फेब्रुवारी या दिवशी होणारा श्री साईपालखी सोहळा रहित करण्यात आला आहे.

शहरात विना‘मास्क’ फिरणार्‍या प्रत्येक व्यक्तीला १ सहस्र रुपये दंड, तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर थुंकणार्‍या व्यक्तीला ५ सहस्र रुपये दंड आकारणी केली जाणार आहे, असे येथील नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सांगितले. मोठ्या रकमेचा दंड आकारून पैसे जमा करणे हा नगरपंचायतीचा उद्देश नसून शहराला पुन्हा ‘दळणवळण बंदी’पासून वाचवणे, तसेच येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी या उपाययोजना केल्या जात आहे.

आजही शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक विना‘मास्क’ फिरतांना दिसून येत आहेत. व्यावसायिक, दुकानदार कोविडचे नियम पाळत नाहीत. ‘मास्क’ वापरणे बंधनकारक असूनही तो वापरत नाहीत’, अशा सर्वांना नगरपंचायतच्या पदाधिकार्‍यांनी समज दिली आहे. ‘‘मास्क’ वापरा, नाही तर उद्यापासून १ सहस्र रुपये भरा’, अशी मोहीम नगरपंचायतीने हाती घेतली असून नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नियमावली अशी…

१. सकाळी ६ ते रात्री ९ हा मुखदर्शनाचा कालावधी कोविड मार्गदर्शक तत्त्वे अनुसरून चालू ठेवण्यात येणार आहे.

२. ‘बायोमेट्रिक पास’ काऊंटरवर होत असलेली गर्दी पहाता गुरुवार, शनिवार, रविवार, तसेच उत्सवाचे दिवस ‘बायोमेट्रिक पास’ काऊंटर बंद करण्यात आले आहे. ‘ऑनलाईन’ दर्शन पास व्यवस्था चालू असणार आहे.

३. दर्शन रांगेत भक्तांची ढोबळ चाचणी करण्यात येणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी १५०, तर गुरुवार, शनिवार आणि रविवारी या वारी २०० जणांची चाचणी घेण्यात येणार आहे.