कामाच्या वेळी २ सत्रांत, तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मंत्रालयात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे प्रकरण

मुंबई – मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ‘वर्क फ्रॉम होम’, तसेच २ सत्रांत कामाच्या वेळा निश्‍चित करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना दिले आहेत. मंत्रालयातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाविषयी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी २३ फेब्रुवारी या दिवशी वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. या वेळी महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, तसेच मंत्रालय अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णु पाटील यांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या वेळी सूचना देतांना उद्धव ठाकरे म्हणाले,

१. कार्यालयीन वेळांची सकाळी १० ते सायंकाळी ५ ही मानसिकता पालटण्याची आवश्यकता आहे, असे मी नीती आयोगाच्या बैठकीत सांगितले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृतीचा प्रारंभ करावा.

२. आपण नव्या पद्धतीच्या कामाचा प्रारंभ करून पाहू. ज्यामध्ये कामेही संपूर्ण क्षमतेने आणि व्यवस्थित पार पडतील आणि कोरोनाच्या संसर्गाचा धोकाही न्यून राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन, तसेच सर्वांना विश्‍वासात घेऊन २ सत्रांमध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल, ते पहावे.

३. मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना प्राधान्याने कोरोनावरील लसीकरण करावे. मंत्रालयात नियमितच्या अभ्यागतांची संख्या मधल्या काळात पुष्कळ वाढली आहे. यावर काही प्रमाणात प्रतिबंध असणे आवश्यक आहे.

४. मंत्रालयात नियमित येणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रवेशापूर्वी तापमान पहावे. त्यांची ‘अँटीजेन’ चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. म्हणजे मंत्रालयात संसर्ग असलेली आणि आजारी व्यक्ती येणार नाही, याची निश्‍चिती करता येऊ शकेल. या अनुषंगाने यंत्रणा उभारावी.

५. मंत्रालयात, तसेच राज्यातील अन्यही शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत योग्य ती जंतूनाशके असावीत. वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील, हेही पहावे.