नृत्यकलेमध्ये नाविन्यपूर्ण अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘नृत्यशास्त्रानुसार प्रत्येक मुद्रेला आध्यात्मिक अंग आहे. ‘या मुद्रा विविध प्रकारे केल्यावर आध्यात्मिक स्तरावर, म्हणजे ती मुद्रा केल्यावर मन अंतर्मुख झाल्यावर काय जाणवते ?’, याचा अभ्यास महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे नृत्याच्या माध्यमातून साधना करणारे साधक करत आहेत. हा अभ्यास करतांना प्रत्येक व्यक्तीला येणारे अनुभव त्याच्या आध्यत्मिक स्थितीनुसार उदा. आध्यात्मिक पातळी, सूक्ष्मातील कळण्याची क्षमता इत्यादींनुसार वेगवेगळे असतात. साधकाची साधना जसजशी वाढत जाते, तसतसे त्याला सूक्ष्मातील अधिक आकलन होऊन त्याचा पुढच्या स्तराचा अभ्यास होत असतो. नृत्याच्या माध्यमातून साधना करणारी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिला नृत्यातील विविध मुद्रांचा अभ्यास करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. मुद्रा आणि हस्तमुद्रा यांचा अर्थ
१ अ. मुद्रा : संस्कृत भाषेत ‘मुद्’ या धातूला ‘रा’ हा प्रत्यय जोडून ‘मुद्रा’ हा शब्द बनला आहे. (मुद् (आनंद, आमोद) + रा (आदान करणे, देणे) = मुद्रा (आनंद देणे, शरिराला आकर्षक आकार देऊन आनंद देणे.) वैदिक ग्रंथात ‘मुद्रा’, म्हणजे हाताने केलेला संकेत.
१ आ. हस्तमुद्रा : नृत्यात हाताने केलेल्या मुद्रांना जणू काही नृत्याची भाषाच मानले आहे. हाताच्या मुद्रांना ‘हस्तमुद्रा’ असे म्हणतात. नृत्यामध्ये विविध हस्तमुद्रांचा वापर केला जातो. सखोल अभ्यास करून ऋषिमुनींनी या मुद्रा निश्चित केलेल्या आहेत.
२. नृत्याचा अभ्यास करण्याआधी केलेला भावप्रयोग
‘मी नृत्य करण्यापूर्वी ‘माझ्या डोळ्यांसमोर वैकुंठ येते. वैकुंठात पाऊल टाकतांना मी देहभान विसरून श्रीविष्णूच्या भेटीसाठी आतुर झाले आहे. सर्वत्र प्रसन्न आणि चैतन्यदायी वातावरण आहे. श्रीमन्नारायणरूपी गुरुदेव सर्व साधकांकडे पहात आहेत. त्यांना पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘गुरुदेव आपल्यासाठी किती धडपड करतात. ते प्रत्येक क्षणी साधकांचाच विचार करतात; परंतु ‘मी प्रयत्न अल्प करते. मी प्रत्येक क्षणी गुरुदेवांचा विचार करत नाही’, याची मला खंत वाटली. गुरुदेवांनी सर्व साधकांना आशीर्वाद दिला. ‘तेच सर्वांची प्रगती करवून घेणार आहेत. मला केवळ त्यांच्या चरणांवर लीन व्हायचे आहे’, असे मला वाटले. नंतर भूदेवी आणि श्रीदेवी यांच्या रूपात मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दिसल्या. त्यांचे मुखमंडल चैतन्याने भारित होते. सर्व साधक त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. ‘आपल्याला या कलियुगात साक्षात श्रीमन्नारायण, जे जगाचे पालनकर्ते आहेत, ते गुरु म्हणून लाभले आहेत’, याची मला जाणीव होऊन माझी भावजागृती झाली आणि मी कृतज्ञताभाव, क्षमायाचना अन् शरणागती अनुभवली.’
३. कु. अपाला औंधकर हिने मूळ स्थितीत ‘अराल’ या हस्तमुद्रेचा केलेला अभ्यास
अ. मला मणक्यामध्ये वेदना जाणवल्या.
आ. मला गंधाची अनुभूती आली.
इ. मी शांती अनुभवली.
ई. माझे ध्यान लागले.
४. अन्य अनुभूती
अ. मला कुठल्याही चक्रावर संवेदना जाणवल्या नाहीत.
आ. माझा ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप चालू झाला. मला आतून शांत वाटत होते.
इ. मला ४ ऋषिमुनी दिसले. त्यांनी मी धरलेल्या हस्ताप्रमाणे मुद्रा केली होती. ते एका मोठ्या वृक्षाखाली ध्यान लावून बसले होते. नंतर ते ब्रह्मदेवाकडे गेले. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना ‘तथास्तु’ म्हटले.
ई. ‘मी श्रीविष्णूच्या चरणांवर झोपले आहे’, असे वाटून माझे ३ – ४ मिनिटांसाठी ध्यान लागले. मला शांती जाणवत होती. मी अशी शांतता यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती.
उ. मी प्रयत्नपूर्वक डोळे उघडल्यावर मला जोरात चक्कर येत होती. मला संपूर्ण खोली गोल फिरत असल्याप्रमाणे जाणवत होते: मात्र शरिरात शांतताही जाणवत होती.
ऊ. मला या हस्तमुद्रेच्या वेळी गडद निळा रंग दिसला.
ए. पुन्हा ही हस्तमुद्रा करून पाहिल्यावर ‘गुरुदेव माझ्या सहस्रारचक्रावर ज्ञानाचा प्रकाश प्रक्षेपित करत आहेत’, असे मला दिसले. तेव्हा तो प्रकाश माझ्या शरिरात गेल्यावर मला मणक्यात तीव्र वेदना झाल्या; तरीही मी शांतता आणि एकाग्रता अनुभवली.
ऐ. यानंतर माझ्या शरिरावरील आवरण काढतांना ‘माझ्याभोवती पांढर्या रंगाचे वलय निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले. मला पुष्कळ थकवा जाणवत होता; म्हणून मला आवरण काढावेसे वाटले.
ओ. हे सर्व झाल्यानंतर मला पुष्कळ शक्ती जाणवली; मात्र ती शक्ती मला सहन न झाल्याने ‘माझ्या देहात त्राण नाही’, असे मला वाटले. मी अतिशय दमले होतेे. मी पुष्कळ रडले. मला आईने रडण्याचे कारण विचारल्यावर मी तिला कारण सांगू शकले नाही. मला शक्ती सहन होत नव्हती; पण मला शांतही वाटत होते. मी गुरुदेवांना सूक्ष्मातून विचारले, ‘मला असे का होत आहे ?’ तेव्हा मला स्वतःभोवती पुन्हा एक गोल वलय दिसले. मी हळूहळू शांत झाले. मी ही स्थिती ३० मिनिटे अनुभवली.
नंतर ‘मला ही अनुभूती का आली ?’, हा प्रश्न पडला. नंतर मला स्थिरता जाणवून मी उत्साही झाले.
– कु. अपाला औंधकर , रत्नागिरी (१६.९.२०२०)
|