पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण
मुंबई – पूजा चव्हाण यांच्या मृत्यूचे सखोल अन्वेषण केले जाईल; मात्र मागील काही दिवस, काही मास लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे प्रकारही पुढे आले आहेत. या प्रकरणात तसे काही होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव पुढे आले आहे. १३ फेबु्रवारी या दिवशी उद्धव ठाकरे शिवडी येथे ट्रान्सहार्बरच्या कामाची पहाणी करण्यासाठी गेले असतांना पत्रकारांनी पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येच्या अन्वेषणाविषयी विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही ! – डॉ. (सौ.) नीलम गोर्हे, उपसभापती, विधान परिषद
मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्येचे सत्य लपवले जाणार नाही. प्रकरणात वस्तूस्थितीपर्यंत सरकार पोचेल. नि:पक्षपातीपणे अन्वेषण केले जाईल. कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्हे यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वरील विधान केले.
या वेळी डॉ. (सौ.) नीलम गोर्हे म्हणाल्या, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘‘अपकीर्ती करण्यासाठी राजकारण केले जात नाही ना, हेही पहायला हवे’, असे विधान केले होते. त्याकडे लक्ष दिले जाईल. न्याय आणि अन्याय यांची कायदेशीर चौकट पडताळून निर्णय होईल. काही वेळा अशा बातम्या ‘टी.आर्.पी.’ साठी वारंवार दाखवल्या जातात. यामध्ये मर्यादा, विवेक सुटला तर संवेदनशीलतेकडे वाटचाल होते.’’
राष्ट्रीय महिला आयोगाचे पुणे पोलिसांना पत्र
पुणे – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने नोंद घेतली असून याविषयी आयोगाने पुणे पोलिसांना पत्र पाठवले आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्या की, या प्रकरणाचे अन्वेषण झाल्यानंतर आम्ही महिला आयोगाला अहवाल पाठवणार आहोत.
काही ‘ऑडिओ क्लिप्स’ हा गुन्हा नोंद करण्यासाठी आधार होऊ शकत नाही ! – पुणे पोलीस
या युवतीचे काही कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरून पूजाने एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केली असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. घटनेपूर्वी पूजाने मद्य प्राशन केले होते. काही ऑडिओ क्लिप्स हा गुन्हा नोंद करण्यासाठी आधार होऊ शकत नाहीत, तसेच तिच्या कुटुंबियांनी तक्रार देण्यास नकार दिला असल्याने गुन्हा नोंद करता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नगर – या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.