१०० पेक्षा अधिक पुरस्कार विजेत्यांचे १५ जिल्ह्यांत निवेदन
संभाजीनगर – वर्षभरापूर्वी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याविषयी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन राज्य शासनाने दिले होते; मात्र अद्यापही ते पाळण्यात आले नसल्याने पुरस्कारप्राप्त खेळाडूंनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त करत १९ फेब्रुवारीपूर्वी खेळाडूंच्या हिताचा निर्णय न घेतल्यास येत्या २४ फेब्रुवारी या दिवशी पुरस्कार परत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. राज्यातील १०० हून अधिक पुरस्कार विजेत्यांनी विविध जिल्ह्यांतील क्रीडा कार्यालयांच्या वतीने हे निवेदन दिले आहे.
उत्कृष्ट कामगिरी करत खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचे नाव गाजवतात. राज्य शासनाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यासाठी राज्यातील सर्वोच्च असा ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ त्यांना देण्यात येतो; मात्र त्यानंतर खेळाडूंचे काय होणार ? हा प्रश्न आजपर्यंत अनुत्तरित आहे. खेळासाठी आयुष्य घालवणार्या पुरस्कारप्राप्त खेळाडूंची त्यानंतर फरपट होते. ‘पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासकीय नोकरीत स्थान देण्यात यावे’, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील वर्षी ३१ जानेवारी या दिवशी ‘शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तात्काळ नोकरीत सामावून घेतले जाईल आणि नगरविकास मंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर आपल्या नियुक्ती दिल्या जातील’, असे आश्वासन दिले होते. वर्षभरात त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने खेळाडूंनी वरील निर्णय घेतला.