पुणे – येथील प्रसिद्ध बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) धाड टाकण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी चालू होती. याआधी नोव्हेंबरमध्येही चौकशी करण्यात आली होती. सहा वर्षांपूर्वींच्या विदेशी चलन प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अविनाश भोसले यांच्या ए.बी.आय.एल्. कार्यालयात चौकशी चालू असून आयकर विभागाकडून त्यांच्या पुणे आणि मुंबईतील २३ ठिकाणांवर छापा टाकण्यात आला. अविनाश भोसले यांची कन्या स्वप्नाली (काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या पत्नी) यांनाही या प्रकरणी दोन आठवड्यांपूर्वी नोटीस पाठवली असल्याचे वृत्त आहे.