अमरावती – जिल्ह्याचा आदिवासी भाग असलेल्या धारणी आणि चिखलधरा या तालुक्यांतील २४ गावे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर आजही विजेवाचून अंधारातच आहेत. याविषयी खासदार नवनीत राणा यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या २४ गावांत वीजपुरवठा चालू करण्याची मागणी केली. (देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही २४ गावांत वीज नाही, हे प्रशासन आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद आहे. खासदार नवनीत राणा यांच्यापूर्वी खासदार झालेल्या लोकप्रतिनिधींनी याविषयी लोकसभेत आवाज का उठवला नाही ? असे लोकप्रतिनिधी जनतेचे हित कधीतरी साधू शकतील का ?- संपादक)
संसदेचे चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येथील खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मी विनंती करते की, केंद्र शासनाने या गावांना वीज जोडणी देण्यासाठी ‘विशेष योजना’ आखून त्यासंबधीचे आदेश द्यावेत आणि त्या आदिवासींच्या जीवनातील अंधार दूर करावा.