१. जवळीक साधणे
‘आई सर्वांवर सारखेच प्रेम करते. आमच्या शेजारी लहान मुलगी आहे. आई तिलाही आईची माया देत असल्याने ती माझ्या आईला ‘आई’ म्हणते. बर्याच जणांना आईशी बोलल्यावर चांगले वाटते. काही साधक आईशी स्वत:हून मनमोकळेपणाने बोलतात. आता आई-वडील दुसर्या ठिकाणी रहायला गेल्याने साधकांना घरी यायला शक्य होत नाही; पण ते अजूनही आईची आठवण काढतात.
२. मतीमंद मुलीचे सर्व करतांना आईमध्ये जाणवलेले पालट
२ अ. मुलगी मतीमंद असल्याने आईला तिचे सर्वच करावे लागणे आणि ‘तिचे सर्व साधना म्हणून करा; म्हणजे तुमची साधना होईल’, असे आधुनिक वैद्या माया पाटील यांनी सांगणे : माझी बहीण प्रज्ञा ही मतीमंद असल्याने आईला लहानपणापासून तिचे वैयक्तिक आवरणे, जेवण भरवणे इत्यादी सर्वच करावे लागते. बहिणीला त्रास असल्याने ती बर्याच वेळा चिडचिड करते किंवा आईला मारते; परंतु आई तिचे सर्व साधना म्हणून करते. काही वर्षांपूर्वी आधुनिक वैद्या माया पाटील यांनी आईला सांगितले, ‘‘तिचे सर्व साधना म्हणून करा, म्हणजे तुमची साधना होईल.’’
२ आ. आईची प्रकृती बरी नसतांना बहिणीला बरे नसणे आणि त्या वेळी काही कारणांमुळे स्वतःला जाता न येणे, आईला बहिणीचे करावे लागणे, तरीही आईच्या मनात जराही प्रतिक्रिया नसणे अन् ती सर्व करतांना स्थिर असणे : मे २०१९ मध्ये आईला मायग्रेनचा त्रास होत होता. तिला अशक्तपणा आल्याने आधुनिक वैद्यांनी तिला सलाइन लावले होते. तेव्हा ‘तिला बरे नसल्याने प्रज्ञाला सांभाळणे आणि घरात साहाय्य करण्यासाठी म्हणून मी येऊ शकते का ?’, असे तिने मला विचारले होते; परंतु काही कारणामुळे मला जाता आले नाही. आईला बरे नसतांना प्रज्ञाला पुष्कळ ताप आला. तिला आकडीचा त्रास होऊ लागला. तेव्हा आईला स्वत:चे आजारपण बाजूला ठेवून प्रज्ञाला आधुनिक वैद्यांकडे नेणे, ‘तिला पुष्कळ ताप असल्याने मिठाच्या पट्ट्या ठेवणे’, असे सर्व करावे लागले. आई हे सर्व करतांना स्थिर होती. ‘मी आले नाही’, याविषयी तिच्या मनात जराही प्रतिक्रिया नव्हती. पूर्वी अशा प्रसंगात ती खचून जायची; मात्र या वेळी ती स्थिर होती.
२ इ. ‘पूर्वी बहीण रुग्णाइत झाल्यास आईला ताण येऊन ‘पुढे कसे होईल ?’, या विचाराने रडू येणे; परंतु आता बहीण रुग्णाइत झाल्यास पूर्वीसारखा त्रास न होता आई स्थिर असणे : पूर्वी बहिणीला २ – ३ मासांतून एकदा आकडी येण्याचा त्रास होत असे. आकडी आल्यावर तिला आधुनिक वैद्यांकडे नेल्यावर ३ – ४ दिवस तिला सलाईन लावून रुग्णालयात भरती करून घ्यायचे. या सर्वांचा परिणाम म्हणजे बहिणीला जे काही शिकवले असेल ते ती सर्व विसरून जात असे. ती आजारी पडली की, पूर्वी आईला पुष्कळ ताण येत असे. ‘त्यामुळे ती पुढे कसे होईल’, या विचाराने रडतही असे; पण आता बहीण रुग्णाइत झाल्यास आई स्थिर असते. त्याचा तिला पूर्वीसारखा त्रास होत नाही.
२ ई. सनातन संस्थेच्या वतीने कुठलेही मार्गदर्शन असल्यास आईला ऐकायला न मिळणे; मुलीमुळे बाहेर थांबावे लागत असले, तरीही आई आनंदी असणे : आईला कोणत्याही नातेवाईकाकडे किंवा कुठेही फिरायला जायचे म्हटले, तरी तिला सहजतेने जाता येत नाही; पण तिचे याविषयी कधीही गार्हाणे नसते. सनातन संस्थेच्या वतीने कुठलेही मार्गदर्शन, गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम किंवा कोणताही कार्यक्रम असतांना तिला कधीही ऐकायला मिळत नाही. प्रज्ञामुळे तिला कार्यक्रम चालू असलेल्या सभागृहाच्या बाहेरच थांबावे लागले, तरी ती आनंदी असते. ती बाहेर बसून चप्पल व्यवस्था किंवा लहान मुलांना सांभाळणे, या सेवा आनंदाने करते.
२ उ. एका संतांनी थोडे दिवस आश्रमात राहून बघण्यास सांगणे, आश्रमात रहाण्याचे नियोजन झाल्यावर प्रज्ञाने कितीही त्रास दिला, तरी आई आनंदीच असणे आणि आश्रमाचा लाभ होण्यासाठी अधिकाधिक प्रार्थना अन् नामजप करणे : आईला आश्रमात रहायला आवडते; पण प्रज्ञामुळे तिला ते शक्य नव्हते. सोशल मिडीयाच्या शिबिरासाठी माझा भाऊ रामनाथीला आश्रमात गेला होता. तिथे त्याची एका संतांशी भेट झाल्यावर त्याने संतांना सांगितले, ‘‘आईची पूर्णवेळ होण्याची इच्छा आहे; परंतु बहीण मतीमंद असल्याने आईला पूर्णवेळ होता येत नाही.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आईला तुझ्या बहिणीला घेऊन थोडे-थोडे दिवस आश्रमात राहून बघायला सांग.’‘ तेव्हा गुरुपौर्णिमेनंतर आईचे आश्रमात येण्याचे नियोजन झाले. आई आश्रमात आल्यावर प्रज्ञाने कितीही त्रास दिला, तरी आईची कधीच चिडचीड झाली नाही. तिच्या मनात त्याविषयी नकारात्मक विचारही आले नाही. ती स्थिर होती. आई आश्रमात असतांना प्रज्ञाला एक दिवस बरे नव्हते, तरी आई पुष्कळ स्थिर होती. एरव्ही तिला बरे नसल्यास आईला तिची पुष्कळ काळजी वाटते. प्रज्ञा त्रास देत असल्याने आईला आश्रमातील काही सेवा करता येत नसे. आईला प्रज्ञालाच पूर्णवेळ सांभाळावे लागत असे, तरी आई आनंदी होती. आश्रमातील चैतन्याचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी ती सतत नामजप आणि प्रार्थना करत होती.
३. रुग्णाइत असतांनाही आईला पूर्ण विश्रांती मिळत नसणे आणि तरीही यासंदर्भात तिची काहीच तक्रार नसणे
आईला तीव्र त्रास आहे. तिला प्रत्येक रात्री स्वप्ने पडतात. त्यामुळे बर्याच वेळा तिला रात्री शांत झोप लागत नाही. तिला खांदेदुखी (फ्रोझन शोल्डर), तीव्र आम्लपित्त, डोकेदुखी (मायग्रेन) आणि अल्प रक्तदाब, असे त्रास आहेत. ती पुष्कळ वेळा रुग्णाइत असते. ती रुग्णाइत असतांनाही तिला पूर्ण विश्रांती मिळत नाही, तरी यासंदर्भात तिचे काही गार्हाणे नसते. तिला शक्य होईल तसे ती करत असते.
४. आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी मुलींना दिलेला पाठिंबा
४ अ. ‘पूर्णवेळ साधकाशीच लग्न करीन’, या मुलीच्या मताला पाठिंबा देणे : मी पूर्णवेळ सेवा करत असतांनाही माझ्या लग्नासाठी बरेच नातेवाईक पुष्कळ आग्रह करायचे किंवा बोलायचे; पण आई त्याकडे दुर्लक्ष करायची. ती आम्हाला याविषयी कधी कळू देत नसे. ‘मी पूर्णवेळ साधकाशी लग्न करीन’, असे मी ठरवले होते. आईने मला पूर्णपणे पाठिंबा दिला.
४ आ. मुलींनी घरी भ्रमणभाष केल्यास त्यांच्याशी साधनेविषयीच बोलणे आणि त्यांना प्रत्येक प्रसंगात सकारात्मक दृष्टीकोन देणे : ती घरातील कामे करतांना भ्रमणभाषवर नामजप लावून ठेवते आणि घरातील कामे झाल्यावर बसून नामजप करते. घरात काही प्रसंग झाल्यास आईला त्याचा त्रास होत असल्यास पूर्वी ती मला किंवा माझी बहीण पल्लवी हिला त्याविषयी भ्रमणभाष करून सांगत असे. आता ती स्वतःहून भ्रमणभाष करत नाही. आता काही प्रसंग झाल्यास ती देवाशी बोलते. ‘यातून देवाला मला काय शिकवायचे होते’, असा ती विचार करते. आम्ही तिला भ्रमणभाष केल्यास ती ‘आमचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न चालू आहेत ना’, याविषयी बोलते. आईला आम्ही कधी काही सांगण्यासाठी भ्रमणभाष केल्यास ती आम्हाला सकारात्मक दृष्टीकोन देते.
५. पूर्वी आईच्या मनात काही नातेवाइकांविषयी पूर्वग्रह असल्याने तिला त्याचा त्रास होणे, आता ती प्रत्येक प्रसंगाकडे साक्षीभावाने पहात असल्याने ‘या प्रसंगातून देवाला काय शिकवायचे होते’, असा विचार करणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे
कुटुंबातील पूर्वीच्या प्रसंगावरून कुटुंबातील काही व्यक्तींंविषयी तिच्या मनात पूर्वग्रह होता. तशाच प्रकारचा प्रसंग पुन्हा घडल्यास तिला पूर्वीचे प्रसंग आठवून त्याचा पुष्कळ त्रास होत असेे. आता तिला कुटुंबातील व्यक्तींकडून अपेक्षा नसतात. काही प्रसंग घडल्यास तिला आता मानसिक त्रास होत नाही. ती त्या प्रसंगाकडे साक्षीभावाने पहाते. ‘या प्रसंगातून देवाला मला काय शिकवायचे होते’, असा विचार ती करते. पूर्वी काही नातेवाइकांविषयी तिच्या मनात पूर्वग्रह असल्याने तिला त्यांच्याशी प्रेमाने वागायला जमत नसे. आता ती त्यांच्याशीही प्रेमाने वागते.
६. घरी मिळेल ती सेवा मनापासून करणे
आईची सेवेची तळमळ पुष्कळ आहे. तिला घरी बसून करता येईल अशी सेवा दिली, तर ती कधीच त्या सेवेला नकार देत नाही. तिला आश्रमातील साधकांसाठी पोळ्या करून देणे, चादर किंवा कनाती धुणे, ‘बॅनर्स’ किंवा चादरी यांना इस्त्री करणे, अशा सेवा दिल्या जातात. तिला थोडे बरे नसले, तरी ती त्या सेवा करते. तिला आम्ही म्हटले, ‘‘अगं, तुला बरे नाही, तर सेवा करू नको.’’ तेव्हा ती म्हणते, ‘‘तेवढेच सेवेतून चैतन्य मिळते.’’ आधी आमचे घर आश्रमापासून जवळ होते. तेव्हा तिला शक्य होईल तसे ती आश्रमात जाऊन सेवा आणि नामजप करत असे. आता घर आश्रमापासून दूर गेल्याने तिला ते शक्य होत नाही. घरी सेवा मिळाली, तर ती मनापासून करते.’
– सौ. अक्षरा शिंदे (मुलगी), सनातन आश्रम, देवद,पनवेल. (११.८.२०१९)
|