अनधिकृतपणे चालू असलेले ‘धिर्यो’ आणि पशूवधगृहे यांच्यावर कारवाई करा अन्यथा कायदेशीर कारवाई करू ! – गोवंश रक्षा अभियान

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर गोवंश रक्षा अभियानचे कार्यकर्ते

मडगाव, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – दक्षिण गोव्यात कोलवा, बाणावली आदी ठिकाणी अनधिकृतपणे ‘धिर्यो’चे (बैल किंवा रेडे यांच्या झुंजीचे) आयोजन केले जात आहे, तसेच दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी अनधिकृत पशूवधगृहे कार्यरत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ‘धिर्यो’वर बंदी घातलेली असतांना, तसेच पशूवधगृहे अनधिकृतपणे चालू असतांनाही त्यावर कारवाई करण्यास प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. अनधिकृतपणे चालू असलेले ‘धिर्यो’ आणि पशूवधगृहे यांवर कारवाई न केल्यास न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट करण्यात येणार असल्याची चेतावणी ‘गोवंश रक्षा अभियान’ने शासनाला दिली आहे. ‘गोवंश रक्षा अभियान’ आणि विविध गोप्रेमी संघटना ११ फेब्रुवारी या दिवशी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर ‘गोवंश रक्षा अभियान’चे श्री. हनुमंत परब यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. या वेळी शिष्टमंडळामध्ये केपे येथील पू. सुदर्शन स्वामी, ‘परशुराम गोमंतक सेने’चे श्री. शैलेंद्र वेलिंगकर, गोप्रेमी श्री. जयेश नाईक, ‘गायत्री परिवार’चे श्री. मिश्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. हनुमंत परब

‘गोवंश रक्षा अभियान’चे श्री. हनुमंत परब पुढे म्हणाले, ‘‘पैशाच्या लोभापायी ‘धिर्यो’चे आयोजन केले जात आहे. ‘धिर्यो’च्या विरोधात तक्रार करूनही पोलीस याविरोधात धिम्या गतीने कारवाई करतांना आढळतात. आगामी काळात गोवंशियांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात लोकजागृती करून याविषयी सरकारवर दबाव आणला जाणार आहे.’’

पू. सुदर्शन स्वामी या वेळी म्हणाले, ‘‘धर्मो रक्षति रक्षित:’ या उक्तीनुसार धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्मच रक्षण करत असतो. आज हिंदू बहुसंख्य असूनही हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात केले जातात. गोव्याला ‘गोमंतक’ हे नावही गोमातेवरूनच मिळाले आहे. गोव्यात गोवंशियांची हत्या बंद न झाल्यास पुढे गोव्यात गोवंश संपेल. ’’

भाजप शासनाला गोमातेचे वर्णन असलेल्या एकात्ममानव दर्शनाचा साक्षात्कार होऊ दे, अशी प्रार्थना ! – शैलेंद्र वेलिंगकर

या वेळी ‘गोमंतक परशुराम सेने’चे श्री. शैलेंद्र वेलींगकर म्हणाले, ‘‘समाजातील काही घटक घटनेची पायमल्ली करून विकृत प्रथांना आपली परंपरा असे संबोधून ‘धिर्यो’चे आयोजन करत आहेत. या संस्कृतीद्रोही घटकांचा निषेध आहे. आज पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी आहे. या दिवशी विद्यमान भाजप शासनाला पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे आणि गोमातेचे वर्णन असलेल्या एकात्ममानव दर्शन यांचा साक्षात्कार होऊ दे, अशी प्रार्थना आहे. गोव्यातील राजधर्म यांवरच अधिष्ठित असावा.’’