५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ढवळी (फोंडा, गोवा) येथील चि. स्वोजस प्रभास नायक (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. स्वोजस प्रभास नायक हा एक आहे

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

माघ शुक्ल पक्ष प्रतिपदा (१२.२.२०२१) या दिवशी चि. स्वोजस प्रभास नायक याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. स्वोजस प्रभास नायक

चि. स्वोजस प्रभास नायक याला तिसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !  

१. नीटनेटकेपणा

‘चि. स्वोजस बर्‍याच गोष्टी लक्षपूर्वक करतो; पण एखाद्या वेळी त्याच्याकडून काही सांडले, तर तो लगेच जाऊन पुसायला कापड घेऊन येतो आणि ती जागा पुसून स्वच्छ करतो.

२. प्रांजळपणा

त्याला त्याच्या दिवसभरातील चुका विचारल्यावर तो प्रांजळपणे ‘मी मस्ती केली. मी जोरात ओरडलो आणि मी रडलो’, असे सांगतो.

३. त्याला स्वतःची कामे स्वतः करायला पुष्कळ आवडते.

४. उत्तम स्मरणशक्ती

त्याला श्री गणपतिस्तोत्र, तसेच सकाळी म्हणावयाचे ‘कराग्रे वसते लक्ष्मी…’ आणि ‘समुद्रवसने देवी…’ हे श्‍लोक तोंडपाठ आहेत. तो मला श्‍लोकातील त्याला कळत नसलेल्या वाक्यांचा अर्थ विचारतो.

त्याला गीतरामायणातील काही गाणी, तसेच रामायण आणि भागवत यांतील बर्‍याच कथाही तोंडपाठ येतात.

५. इतरांना साहाय्य करणे

मी स्वयंपाक करत असतांना तो मला साहाय्य करण्यासाठी येतो. तो त्याच्या वडिलांनाही स्वच्छतेच्या सेवेत आनंदाने साहाय्य करतो.

६. चुकांविषयी संवेदनशील असणे

जर त्याने मस्ती केल्यावर मी किंवा त्याचे वडील त्याच्यावर रागावलो, तर त्याला त्याचे वाईट वाटते आणि तो स्वतःचे कान धरून ‘माझी चूक झाली. मला क्षमा कर’, असे सांगतो आणि श्रीकृष्णाच्या चित्राजवळ जाऊन उठाबशा काढतो.

७. रामायण आणि महाभारत यांतील प्रसंग नाट्यरूपात प्रस्तुत करणे

तो गीतरामायणातील अनेक प्रसंग नाट्यरूपात जसेच्या तसे भावपूर्ण प्रस्तुत करतो, उदा. सीता स्वयंवर, श्रीराम वनवासाला जात असतांनाचा प्रसंग, त्राटिका वध इत्यादी. ‘श्रीकृष्ण’ ही मालिका चालू असतांना तो स्वतः कृष्ण व्हायचा आणि ‘हातात सुदर्शनचक्र घेऊन दैत्यांचा नाश करणे, युद्ध करणे’ हे सगळे प्रसंग तो नाट्यरूपात प्रस्तुत करायचा.

८. सूक्ष्मातील कळणे​

शेजार्‍यांनी कितीही बोलावले, तरी तो त्यांच्या घरी जात नाही. जे कुटुंब साधना करते, केवळ त्या घरात जायला त्याला आवडते.

९. देवावरील श्रद्धा

‘रामायण’ आणि ‘श्रीकृष्ण’ या मालिका बघतांना त्याच्या मनात कधी शंका निर्माण झाल्या नाहीत. ‘श्रीराम आणि श्रीकृष्ण हे देव आहेत’, अशी त्याची पूर्ण श्रद्धा आहे आणि ‘त्यांनी केलेले योग्यच आहे’, असे त्याच्या बोलण्यावरून प्रत्येक वेळी जाणवते.

१०. अनुभूती

१० अ. संतांच्या चैतन्यदायी सत्संगात साजरा झालेला स्वोजसचा वाढदिवस ! : स्वोजसच्या दुसर्‍या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही रामनाथी आश्रमातील चैतन्य ग्रहण करण्यासाठी आश्रमात गेलो होतो. तेथे आम्ही प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला नमस्कार करत असतांना पायर्‍यांवरून प.पू. दास महाराज येत होते. स्वोजसने त्यांना नमस्कार केल्यावर मी सांगितले, ‘‘आज त्याचा वाढदिवस आहे.’’ तेव्हा प.पू. दास महाराजांनी आम्हा सर्वांना ‘प्रसाद घेण्यासाठी अर्ध्या घंट्याने तुम्ही खोलीत येऊ शकता’, असे सांगितले. त्या दैवी अर्ध्या घंट्यात आम्हाला आणखी चार संतांचे, म्हणजे पू. वामनदादा (पू. वामन राजंदेकर), पू. उमेश शेणै, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. बाबा नाईक यांचे दर्शन झाले. ‘आमच्यावर जणू चैतन्याचा वर्षावच होत आहे’, असे आम्हाला वाटत होते. त्यानंतर आम्ही प.पू. दास महाराजांच्या दर्शनासाठी त्यांच्या खोलीत गेलो. तेथे त्यांनी आम्हा सर्वांना प्रसाद दिला आणि सर्वांची पुष्कळ आत्मीयतेने विचारपूस केली. ‘न भूतो न भविष्यति’ असा वाढदिवस साजरा झाला.

१० आ. साधिकेला स्वोजसच्या सहवासात सुगंधाची अनुभूती येणे आणि त्या वेळी ‘परात्पर गुरुदेव आशीर्वाद देण्यासाठी घरी आले आहेत’, या विचाराने भाव जागृत होणे : त्यानंतर घरी सौ. लता ढवळीकर आणि सौ. सुप्रिया नाडकर्णी या स्वोजसला शुभेच्छा देण्यासाठी थांबल्या होत्या. त्यांनी शुभेच्छा देताच स्वोजसने झोपून ‘कृतज्ञ आहे’, असे सांगितल्यावर लताताईंना सुगंधाची अनुभूती आली. तेव्हा ‘परात्पर गुरुदेव आशीर्वाद देण्यासाठी घरी आले आहेत’, या विचाराने माझा भाव जागृत झाला.

१० इ. वाईट शक्तीचा त्रास होत असतांना एका रात्री मनात असंख्य विचार येणे, दत्तगुरूंना प्रार्थना केल्यावरही मनातील विचार न्यून न होणे आणि स्वोजसला घट्ट धरताक्षणी मनातील सगळे विचार एकाएकी न्यून होणे : मला दीड मास वाईट शक्तीचा त्रास जाणवत होता. त्यावर आध्यात्मिक उपाय, औषधे, व्यायाम असे सगळे उपाय चालू होते; पण मनात नकारात्मक विचार आल्यावर ते थांबत नव्हते. असेच एका रात्री मला असंख्य विचारांनी घेरले. ‘परम दयाळू दत्तात्रेयांना शरण जायचे आहे’, असा विचार माझ्या मनात आला आणि मी पुनःपुन्हा ‘दत्ता, मला वाचव’, अशी हाक मारू लागले; परंतु विचार काही थांबत नव्हते आणि ‘आवरणही वाढत आहे’, असे मला जाणवत होते. तेव्हा ‘स्वोजसला घट्ट धरून झोपू’, असे मला वाटले. त्याला घट्ट धरताक्षणी माझ्या मनातील सगळे विचार एकाएकी न्यून झाले. ‘हा चमत्कार कसा झाला ?’, हे मला कळले नाही. त्यानंतर गुरुदेव आणि दत्तगुरु यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून मी झोपी गेले.

११. स्वभावदोष

भावनशीलता, हट्टीपणा, मनाप्रमाणे वागणे आणि विचार न करता लगेच प्रत्युत्तर देणे.

१२. गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

​हे विष्णुस्वरूप, प्रीतीस्वरूप, त्रिकालज्ञानी गुरुमाऊली, आम्ही पूर्णपणे अपात्र असतांनाही आणि आमची कोणतीही क्षमता नसतांना तुम्ही आम्हाला दैवी बालक दिले. त्याच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला ‘मी तुमच्या समवेत आहे’, असे क्षणोक्षणी सांगत आहात. ‘स्वोजसच्या आमच्या जीवनात येण्याने तुम्हीच आमच्यात पालट घडवून आणला आहे’, याविषयी आणि अनंत जन्मांत तुम्ही केलेल्या कृपेबद्दल आम्ही तुमच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. ‘त्याच्याकडून आम्हाला शिकता येऊ दे. त्याची आणि आमची साधना तुम्हाला अपेक्षित अशी तुम्हीच करवून घ्या’, हीच तुमच्या पावन चरणी लीन होऊन शरणागतीने प्रार्थना आहे.’

– सौ. गौरी प्रभास नायक (स्वोजसची आई), ढवळी, फोंडा, गोवा. (जानेवारी २०२१)