कोल्हापूर – देहलीत चालू असणारे शेतकर्यांचे आंदोलन म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असा प्रकार चालू आहे. सरकार सर्व मागण्यांवर चर्चा करायला सिद्ध असतांना शेतकर्यांनी आडमुठे धोरण ठेवले आहे. त्यांना प्रश्न सोडवून घ्यायचे नाहीत, त्यांना तमाशा करण्यात रस आहे, अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली. ते कोल्हापूर येथे ९ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
१. कोरोनापेक्षा भयंकर ‘कॅण्डीडा ऑरिस’ ही बुरशी पिकांवर येत आहे. पर्यावरणातील पालटामुळे असे विषाणू मनुष्यजातीला संपवण्यासाठी येत आहेत. देशातील अधिकार्यांनी केवळ कागदावर झाडे लावली आहेत. जिल्ह्यात ३३ टक्के राखीव जंगल असावे लागते; पण लातूर जिल्ह्यात केवळ अर्धा टक्के जंगल शिल्लक आहे. हे दुर्दैवी आहे.
२. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘युरो सिक्स इंजिन’ असणार्या गाड्या वापरण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाविषयी त्यांचे मी अभिनंदन करतो.
३. दिवसा आणि रात्रीही वड अन् पिंपळ हे कार्बन डायऑक्साईड शोषण्याचे काम करते. पृथ्वीवरील प्राणवायूचे प्रमाण वाढवण्यासाठी या २ झाडांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे.
४. गोदावरी आणि मांजरा नदी लातूर जिल्ह्यातून वाहतात. गेल्या ३ वर्षांपासून पाण्याची अधिक टंचाई जाणवत आहे. त्यामुळे हे संकट टाळण्यासाठी या दोन्ही नदीच्या ४ सहस्र हेक्टर क्षेत्रात २० लाख बांबूची झाडे लावण्याचा संकल्प मी केला आहे.