कोरोनाचे नियम मोडणार्‍या मुंबई येथील ५७ सहस्रांहून अधिक नागरिकांवर गुन्हे नोंद

आपत्कालीन स्थितीतही नियमांचे पालन न करणार्‍या जनतेची आपत्कालामुळे हानी झाली, तर त्याला ती स्वतःच उत्तरदायी असेल !

मुंबई – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये लागू करण्यात आलेल्या दळणवळणबंदीपासून आतापर्यंत मुंबईत ५७ सहस्र ३५० जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. एकीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कायदेशीर मार्गाने नोंद झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी घोषणा केली. कारवाईचा वेग मंदावला असला, तरी पोलिसांकडून गुन्ह नोंद करण्याचे काम चालू आहे. इतकेच नाही, तर गुन्ह्यांची नोंद झालेल्यांवर आरोपपत्र प्रविष्ट केली जात असल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, अत्यावश्यक वस्तू कायदा, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा, शासकीय आदेशाचे उल्लंघन, जमावबंदी आदेश धुडकावणे, अफवा पसरवणे अशा विविध कायद्यांतर्गत असलेल्या कलमांद्वारे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. २५ सहस्र ७९९ जणांना अटक करून, तर २२ सहस्र ६५९ जणांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.