कोरोनाच्या संकटामुळे बुलढाणा येथील विवेकानंद जन्मोत्सव रहित !

हिवरा आश्रम

बुलढाणा – विदर्भातील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे ‘विवेकानंद जन्मोत्सव’ हा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे प्रतीवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा उत्सव रहित करण्यात आला आहे. हिवरा आश्रम येथे देशभरातून लाखो भाविक श्री सुखदास महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.

३ दिवस हा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. प्रतिदिन विविध कार्यक्रम घेण्यात येतात. त्यामध्ये व्याखाने, कीर्तन, भारूड असे असंख्य कार्यक्रम घेतले जातात, तसेच या जन्मोत्सवाचे आकर्षण ‘महाप्रसाद’ हे असते. ५० एकर शेतात भाविकांच्या भव्य पंगती बसवल्या जातात. एकाच वेळी पंगतीत १० लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. पंगतीला ट्रॅक्टरच्या साहाय्याने हा महाप्रसाद वितरित केला जातो. हा महाप्रसाद म्हणजे जन्मोत्सवाचा समारोप असतो. या वर्षी हा उत्सव रहित करण्यात आल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे. आश्रम समितीने ‘ऑनलाईन’ फेसबूकद्वारे दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.