पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – माघ वारीच्या पार्श्वभूमीवर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर २ दिवस बंद रहाणार आहे. चार मुख्य वार्यांतील माघ वारीला विशेष महत्त्व आहे. कोरोनामुळे दशमी आणि एकादशी या दिवशी श्री विठ्ठलाचे दर्शन बंद रहाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास येथे पार पडली. या वेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, साधना भोसले यांसह अन्य सदस्य उपस्थित होते. या वेळी ह.भ.प. औसेकर महाराज म्हणाले की, शासनाने २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दळणवळण बंदी लागू केलेली आहे. माघ वारी कालावधीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची परंपरा पाळण्यात येणार असून मंदिराच्या बाहेरील नियमांविषयी शासन निर्णय घेईल.