कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदीमुळे वर्ष २०२० मध्ये गोव्यात महिलांच्या विरोधातील अत्याचारांत वाढ !

यावरून समाजाने साधना करणे किती आवश्यक आहे, ते लक्षात येते !

मडगाव, १४ जानेवारी (वार्ता.) – कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदीमुळे वर्ष २०२० मध्ये गोव्यात महिलांच्या विरोधातील अत्याचारांत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या काळात घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. दळणवळण बंदीमुळे सर्वांना घरीच रहावे लागल्याने हिंसेत वाढ झाली आहे.

निर्भया हत्याकांडानंतर देशभरात न्यायाधीश वर्मा यांच्या अहवालाच्या आधारावर अत्याचार झालेल्या महिलांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ‘वन स्टॉप सेंटर’ ही केंद्रे खुली करण्यात आली आहेत. पोलिसांनी महिलांवरील अत्याचारासंबंधीची प्रकरणेही या ‘वन स्टॉप सेंटर’कडे नोंद करणे आवश्यक असते. गोव्यात मडगाव येथे ‘वन स्टॉप सेंटर’ हे केंद्र आहे. या ठिकाणी यंदा गतवर्षीच्या तुलनेत महिलांवरील अत्याचाराची दुप्पट प्रकरणे नोंद झाली आहेत आणि यामधील ३० टक्के प्रकरणे गोव्यात वास्तव्यास असलेल्या गोव्याबाहेरील व्यक्तींशी निगडित आहेत. या केंद्राचे व्यवस्थापन पहाणार्‍या महिला नेत्या आवडा व्हिएगस म्हणाल्या, ‘‘वर्ष २०२० मध्ये दळणवळण बंदीमुळे महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत दळणवळण बंदीमुळे कुटुंबातील पुरुष अधिक वेळ त्यांच्या कुटुंबासमवेत घालवत आहेत. गतवर्षी केंद्राकडे दक्षिण गोव्याची बलात्कारासंबंधी २० प्रकरणे नोंद झाली आहेत.’’

अल्पवयीन मुलींवरील बलात्काराची वाढती प्रकरणे ही चिंतेची गोष्ट !

आवडा व्हिएगस पुढे म्हणाल्या, ‘‘वर्ष २०२० मध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्काराची वाढती प्रकरणे घडली असून ही एक चिंतेची गोष्ट ठरत आहे. या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुली त्यांचा मित्र म्हणून समजला जाणारा अल्पवयीन मुलगा किंवा पुरुष यांच्याकडून बलात्काराची शिकार होत आहेत. अशा अनेक प्रकरणांमध्ये अनेक अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्या आहेत. मुलांना लैंगिक शिक्षण दिले जात नसल्याने हा प्रकार घडत आहे. (लैंगिक शिक्षण नव्हे, तर नीतीमत्तेचे म्हणजेच धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! – संपादक) अशा स्वरूपाची प्रतिमास सरासरी सुमारे १० प्रकरणे नोंद होत आहेत. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांच्या संमतीने सर्व प्रकार घडत आहे; कारण अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अल्पवयीन मुलगा किंवा पुरुष हा मुलीसमवेत मित्र म्हणून कुटुंबासमवेत बराच वेळ घालवत असतो. ‘बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या’नुसार (पोक्सो) रक्ताचे नाते असल्याशिवाय कोणत्याही अल्पवयीन मुलीला घरी ठेवता येत नाही. ‘पोक्सो’ कायद्याविषयी जागृती केल्यास या प्रकाराला आळा बसू शकतो.’’