महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी फेटाळला !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप करून मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली होती; मात्र मुंडे यांनी या महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत. महिलेने केलेले सर्व आरोप खोटे असून माझी अपकीर्ती (‘ब्लॅकमेल’) करणारे आणि माझ्याकडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे, असा खुलासा मुंडे यांनी सामाजिक माध्यमांतील फेसबूकमधून केला आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी महिलेच्या आरोपावर स्पष्टीकरण देतांना फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की,
१. सामाजिक माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्रे प्रसारित होत आहेत. माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. एका महिलेसमवेत मी वर्ष २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो.
२. ही गोष्ट माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना माहीत होती. परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी २ मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव असून ही मुले माझ्यासमवेतच रहातात.
३. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनीही या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.
४. ही महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांचे मी सर्वतोपरी पालनपोषणाचे दायित्व स्वीकारले आहे; मात्र वर्ष २०१९ पासून ही महिला आणि त्यांची बहीण यांनी मला ‘ब्लॅकमेल’ करून पैशाची मागणी करण्यास प्रारंभ केला.
५. माझ्या जिवाला गंभीर शारीरिक इजा आणि धोका करण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा सहभागी होता. याविषयी मे २०१९ ते १२ नोव्हेंबर २०२० पासून घडत असलेल्या या सर्व गोष्टींच्या संदर्भात पोलिसांकडे तक्रारही देण्यात आलेली आहे.
६. या महिलेने दूरभाषवरून मला कोट्यवधी रुपये मागितल्याचे संदेशरूपी पुरावे आहेत, तसेच मी उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेत ही तरुणी त्यांच्या सोयीने प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न करत असून हा दबावतंत्राचा भाग असू शकतो. माझ्यावरील आरोपांवर विश्वास ठेवू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे. |