समुद्रकिनार्‍यावर मद्यपान केल्यास व्यक्तीसाठी २ सहस्र रुपये, तर गटासाठी १० सहस्र रुपयांचा दंड

पर्यटकांनी समुद्रकिनार्‍यावर फोडलेल्या मद्याचा बाटल्यांच्या काचा लोकांच्या पायाला लागल्यावर पर्यटन खाते जागे झाले असे समजायचे का ?

प्रातिनिधिक छायाचित्र

पणजी, १० जानेवारी (वार्ता.) –  सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या उपद्रवांना आळा घालण्यासाठी गोवा शासनाने कायदा केल्यानंतर आता पर्यटन खात्याकडून गोव्यातील सर्व समुद्रकिनार्‍यांवर पर्यटकांनी सुमद्रकिनार्‍यावर कोणत्या गोष्टी करू नयेत यासंबंधीचे फलक उभारण्यात आले आहेत.

या फलकांवर लिहिलेल्या सूचनांनुसार एखादी व्यक्ती समुद्रावर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असेल, तर त्याला २ सहस्र रुपयांचा दंड, तर एकापेक्षा अधिक लोक एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असतील, तर १० सहस्र रुपये दंड आकारण्यात येईल. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसानंतर गोव्यातील अनेक प्रसिद्ध सुमद्रकिनार्‍यांवर मद्याच्या बाटल्यांचा खच पडला होता, तसेच इतर कचरा टाकण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर रिकाम्या दारूच्या बाटल्यांच्या काचा लागून अनेक पर्यटक घायाळ झाल्यासंबंधीही तक्रारी आल्या आहेत.

पर्यटन खात्याचे संचालक मेनिनो डिसोझा म्हणाले, ‘‘आमच्याकडे चांगले पोलीसदल असल्याने आम्ही अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो. हा कायदा कार्यवाहीत आणण्यासाठी आम्हाला पोलीस खात्याकडून साहाय्य मिळाले पाहिजे. नवीन वर्षाचा आरंभ झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी समुद्रकिनार्‍यावरील सर्व कचरा उचलण्यात आला. दिवसातून ३ वेळा समुद्रकिनार्‍यावरील कचरा उचलण्यात येतो; परंतु कामगारांना वाळूत असलेले लहान काचेचे तुकडे गोळा करणे शक्य होत नाही.’’

गोव्यात समुद्रकिनार्‍यांची स्वच्छता करण्यासाठी शासनाकडून वर्षाला १० कोटी रुपये खर्च करण्यात येतात. असे असूनही पर्यटकांना समुद्रकिनार्‍यावर मद्याच्या फुटलेल्या बाटल्यांचा काचा लागल्यावर पर्यटकांकडून पयर्र्टन खात्याची नकारात्मक प्रसिद्धी केली जाते.