मुंबई – मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये मानवी शरिरातील प्रतिपिंडांना (अँटिबॉडीज्) भारी पडणारा कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. मुंबई उपनगरातील खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये हा विषाणू आढळला आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराशी हा विषाणू साधर्म्य साधणारा आहे; मात्र याविषयी तज्ञ मंडळींमध्ये मतमतांतरे आहेत.
या विषाणुला ‘ई४८४के’ या नावाने ओळखले जात आहे. रायगड येथील २ आणि ठाणे येथील एका रुग्णामध्ये हा विषाणू आढळला आहे. दोघांमध्येही कोरोनाची साधारण लक्षणे होती. त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. टाटा मेमोरियल सेंटरच्या होमियोपॅथी विभागाचे डॉ. निखिल पटकर यांनी सांगितले की, त्यांच्या संघाने कोरोनाच्या ७०० नमुन्यांच्या जिनोमच्या ‘सिक्वेंसिंग’च्या माध्यमातून पडताळणी केली होती. यांपैकी ३ नमुन्यांमध्ये ‘ई४८४के’ हा विषाणू मिळाला आहे. जुन्या विषाणूमुळे शरीरात प्रतिरोधक क्षमतेमुळे निर्माण झालेल्या ३ ‘अँटिबॉडी’ यावर प्रभावहीन आहेत. याविषयी पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे डॉ. गिरीधर बाबा यांनी म्हटले आहे की, हा विषाणू सप्टेंबरमध्येच भारतात आला आहे. हा धोकादायक असता, तर आतापर्यंत भारतात हाहाकार माजला असता.