पणजी, ९ जानेवारी (वार्ता.) – शासनाकडून नियोजित आय.आय.टी. प्रकल्पासंबंधी शेळ-मेळावली येथील ग्रामस्थांशी चर्चा करण्यास मी सिद्ध आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ९ जानेवारीला पत्रकारांशी बोलतांना केले.
ते म्हणाले, ‘‘मला ग्रामस्थांना त्रास द्यायचा नाही. मी त्यांना पणजी येथे बोलावले होते. त्यांनी मला येऊन भेटावे. शेळ-मेळावली येथील ग्रामस्थ चर्चा करण्यास येण्यासाठी सिद्ध होते; परंतु काही अशासकीय संस्था आणि राजकीय पक्ष यांनी त्यांना तसे न करण्याविषयी सांगितले. ग्रामस्थांनी शासनाला भूसर्वेक्षण करण्यास द्यावे. आय.आय.टी. प्रकल्प हा विकासासंबंधीचे सूत्र आहे; परंतु अशासकीय संस्था आणि राजकीय पक्ष यांना मात्र हा विकास रोखायचा आहे. शासनाविरुद्ध अनेक खटले प्रविष्ट करणार्या या अशासकीय संस्थांचा इतिहास ग्रामस्थांनी पडताळावा. लोकांनी या अशासकीय संस्थांविषयी जाणून घेऊन त्यांना साथ देऊ नये.’’
‘आंदोलन करणार्यांविरुद्ध प्रविष्ट केलेल्या तक्रारी मागे घेतल्या जातील का ?’, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘आंदोलकांनी आधी चर्चा करण्यास पुढे यावे. कोणत्याही लहान मुलाविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न केल्याविषयी तक्रार नोंदवलेली नाही. भूसर्वेक्षणाच्या वेळी आंदोलकांनी तीक्ष्ण हत्यारे घेऊन पोलिसांवर आक्रमण केले. डिचोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक घायाळ झाले. पोलिसांवर तिखटमिश्रित पाणी टाकले गेलेे. गोव्यातील लोकांची प्रवृत्ती अशा प्रकारची असू नये. आम्ही समोरासमोर बसून चर्चा केली पाहिजे. सांगे येथील उसाची लागवड करणार्या शेतकर्यांनी मी सांगे येथे त्यांच्याशी चर्चा करण्यास यावे, असे सांगितले होते; परंतु मी जेव्हा त्यांना पणजीला बोलावले, तेव्हा ते आले आणि हा प्रश्न सोडवला गेला.’’
आरोग्यमंत्री आणि वाळपईचे आमदार विश्वजित सावंत यांनी मात्र या प्रश्नाविषयी मौन बाळगले आहे. याविषयी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘विश्वजित राणे आधीच ग्रामस्थांशी बोलले आहेत. त्यांनी ग्रामस्थांंना समजावण्याचा प्रयत्न केला आहे; गेली कित्येक वर्षे स्थानिक ग्रामस्थांपैकी केवळ १७ कुटुंबे शासकीय भूमीवर पीके घेत होते; परंतु या प्रकल्पामुळे १७ कुटुंबांऐवजी पूर्ण गावालाच लाभ होणार आहे.’’
प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी त्यांचा मुलगा श्री. शैलेंद्र वेलिंगकर याला अटक करणे हा एक कट असल्याचा केलेला दावा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला.