कोल्हापुरात ‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’ या मोहिमेस प्रारंभ

झाडांवर मारलेले खिळे काढतांना स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते

कोल्हापूर – ‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’, या मोहिमेला ३ जानेवारी या दिवशी प्रारंभ करण्यात आला. यात ५० स्वयंसेवी संस्थांसमवेत ५०० हून अधिक वृक्षप्रेमी सहभागी झाले होते. या वेळी शहरातील ठिकठिकाणी जाऊन झाडांवरील खिळे, फलक, तारा, अँगल काढून झाडांना नवसंजीवनी दिली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. ‘ही मोहीम राज्यभर राबविण्यात यावी’, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी या वेळी केले.

झाडांवर मारलेले खिळे काढतांना स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते

अनेक ठिकाणी एका झाडावर ३० ते ४० खिळे असल्याचे आढळले. काही झाडावर असलेले लोखंडी ब्रॅकेट, साखळ्या काढण्यासाठी गॅस कटरचा सुद्धा वापर करण्यात आला. बरीच वर्षे झाडांमध्ये रूतून बसलेले खिळे तसेच करकचून बांधण्यात आलेल्या तारा काढल्यामुळे या झाडांनी मोकळा श्‍वास घेतला. या उपक्रमात ‘रोटरी क्लब ऑफ करवीर’, निसर्ग मित्र, मैत्रेय प्रतिष्ठान, व्हाईट आर्मी, कोल्हापूर हॉटेल मालक संघ विविध संघटना, संस्था सहभागी होत्या.