‘इको ब्रिस्क’चा वापर करून प्लास्टिकच्या कचर्‍याची योग्य विल्हेवाट ! – सुधीर गोरे, सामाजिक कार्यकर्ते

विद्यार्थ्यांचे प्रबोधन करतांना श्री. सुधीर गोरे

मिरज – आपल्या घरात, आजूबाजूला अनेक ठिकाणी प्लास्टिक बाटल्या आणि वेगवेगळ्या माध्यमातून प्लास्टिकचा कचरा पडलेला असतो. हा कचरा विविध माध्यमातून निसर्गात जातो आणि त्याचे मोठे मूल्य आपल्याला चुकवावे लागते. त्यासाठी घरात असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या एका प्लास्टिकच्या बाटलीत भरून त्याची ‘इको ब्रिस्क’ सिद्ध करण्याची संकल्पना आम्ही राबवत आहोत. गेल्या वर्षभरापासून विविध शाळा आणि सामाजिक माध्यमांद्वारे आम्ही याचा प्रसार करत आहोत. ‘इको ब्रिस्क’चा वापर करून प्लास्टिकच्या कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती ब्राह्मणपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि निसर्गमित्र श्री. सुधीर गोरे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’शी बोलतांना दिली.

करमरकर विद्यालयात प्रबोधन केल्यावर गोळा केलेल्या प्लास्टिक बाटल्यांसह श्री. सुधीर गोरे (मध्यभागी मास्क लावलेले, हिरवा टि शर्ट घातलेले) एकत्रित विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक

श्री. सुधीर गोरे म्हणाले

१. ३ वर्षांपर्वी सामाजिक माध्यमांवर ‘इको ब्रिस्क’ची माहिती पहावयास मिळाली होती. याचा आपल्याकडे कसा उपयोग करू शकतो याचा विचार चालू होता. सामान्यत: गृहिणींपासून, सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि आपण सगळेच या प्लास्टिक कचर्‍याचे वाहक असतो. विद्यार्थी चिप्स खाऊन पिशव्या टाकून देतात, तर गृहीणी दुधाच्या पिशव्यापासून अनेक प्रकारच्या पदार्थांसाठी वापरत असलेल्या पिशव्या टाकून देतात. खाऊच्या अनेक गाड्यांवरही प्लास्टिकच्या पिशव्या वापरलेल्या असतात त्या नंतर टाकून दिल्या जातात आणि निसर्गात कचरा म्हणून पडून रहातात. कचरा कुंडीतील हे प्लास्टिक प्राणी खातात आणि त्यातून त्यांना विविध रोगांना सामोरे जावे लागते, पाण्यातील प्लास्टिक जलचरही खातात यामुळे अधिकच धोका उत्पन्न होतो. प्लास्टिकमुळे निसर्गाची भरून न निघणारी हानी होत आहे.

२. यासाठी आम्ही शाळांमध्ये जाऊन याविषयी प्रबोधन करण्यास प्रारंभ केला. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील, परिसरातील प्लास्टिक गोळा करण्यास सांगितले. घरातील दूध, ब्रेड यांसह अन्य उपयोग करून झालेल्या पिशव्या आम्ही विद्यार्थ्यांना गोळा करण्यास सांगितले.

हे प्लास्टिक बारीक तुकडे करून आम्ही एका बाटलीत भरतो. या बाटलीचा उपयोग आम्ही रोपवाटीकेच्या कुंड्यांना खाली पाया म्हणून घालतो, तर काही बाटल्यांमध्ये त्या कापून त्यात रोपे लावतो.

‘इको ब्रिक्स’च्या आवाहनाला शाळा आणि विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. श्री अंबाबाई तालमीच्या करमरकर विद्यालयातील ९ वीच्या २७ मुले असलेल्या एका वर्गातून १ लिटरच्या २३ बाटल्या जमा झाल्या. बाटली भरत असतांना संपूर्ण कोरडे प्लाास्टिक असणे आणि बाटली पूर्ण गच्च भरणे ही खबरदारी घ्यावी लागते.

३. विद्यार्थी दशेत त्यांचे प्रबोधन झाल्यास ते पुढे जाऊन देशाचे नागरिक बनत असल्याने याचा प्रभाव निश्‍चित अधिक होऊ शकेल.

४. ३ वर्षांपूर्वी रस्ता करतांना प्लास्टिकचा वापर करता येतो आणि बेंगळूरू येथे असा प्रयोग झाल्याचे वाचनात आले. याचप्रकारे आम्ही गोळा केलेल्या प्लास्टिकचा यापुढील काळात डांबरीकरणातही उपयोग करण्याचा आमचा मानस आहे. आमच्या गल्लीत होणार्‍या रस्त्यापासून आम्ही त्याचा प्रारंभ करणार आहोत.

५. प्रत्येक नागरिकाने बाहेर खरेदीसाठी जातांना किमान कापडी पिशवी घेऊन जाणे अत्यावश्यक आहे. असे केल्यास आपण कितीतरी निसर्गाची हानी वाचवण्यात यशस्वी होऊ.