दत्तात्रेया तव शरणम् । दत्तनाथा तव शरणम् ॥ त्रिगुणात्मका त्रिगुणातीता । त्रिभुवनपालक तव शरणम् ॥
चिंचोळे, पणजी येथील श्री क्षेत्र पिंपळेश्वर दत्तमंदिरात २९ डिसेंबरला दत्तजयंती उत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त पिंपळेश्वर दत्त मंदिराविषयी थोडक्यात माहिती येथे देत आहोत.
चिंचोळ्यातील पिंपळेश्वरदेवाचा पिंपळ वृक्ष १ सहस्र २०७ वर्षांचा इतिहास घेऊन उभा आहे. या ठिकाणी ५०-६० वर्षांपूर्वी गाडगे महाराजांचे एक शिष्य कीर्तन करत होते. त्या वेळी तेथे एक लहानशीच घुमटी होती. नंतर स्थानिक लोकांनी एकत्र येऊन प्रत्येक शनिवारी कार्यक्रम चालू केला. जागेच्या ठिकाणी ब्राह्मणाचे वास्तव्य असल्यामुळे लोकांकडूनही पावित्र्य पाळण्यात येते. कालांतराने या जागेवर मंदिर बांधण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांंनी पुढे आणला. दत्तभक्तांच्या मनात तेथे दत्तमंदिर बांधण्याचे मनोरथ फार पूर्वीपासून होते आणि जागेचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने तेथे दत्तमंदिर बांधणेच इष्ट ठरले अन् तसाच कौल मिळाला. त्यानंतर भाविकांच्या आणि दत्तभक्तांच्या अपार परिश्रमातून त्याजागी आज उभे असलेले मंदिर साकार झाले.
या ठिकाणी आज कित्येक भाविक त्यांच्या व्यथा घेऊन दत्तमहाराजांच्या समोर येतात आणि भाविकांचा असा दृढ विश्वास आहे की, त्याचे सकल मनोरथ श्री दत्तमहाराज पूर्ण करतात. या परिसरात पाय ठेवताच आपण कुठल्यातरी तीर्थक्षेत्री असल्याचे समाधान मिळते. या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडल्यास तिथेच तात्काळ दाखला मिळतो. याची प्रचीती स्थानिक लोकांनी वारंवार घेतलेली आहे. अशा या पावित्र्याने नटलेल्या श्री क्षेत्र पिंपळेश्वर दत्तमंदिरामध्ये मंगळवार, २९ डिसेंबर या दिवशी दत्तजयंती उत्सव साजरा होणार आहे.
कार्यक्रम
पहाटे ‘श्रीं’ची काकड आरती, नंतर श्रींच्या पादुकांवर दुग्धाभिषेक आणि अन्य धार्मिक विधी, दुपारी ‘श्रीं’ची आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद होईल. सायंकाळी दत्तजन्म सोहळा, रात्री मंदिराच्या आवारात चौघडा वादनासह ‘श्रीं’ची पालखी मिरवणूक, आरती आणि तीर्थप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होईल.
संकलक – श्री. शैलेश नाईक, पणजी, गोवा.
दत्तजयंतीचा इतिहास
‘पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत अनिष्ट शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या अनिष्ट शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस ‘दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.’
जन्मोत्सव साजरा करणे
दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी ७ दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच ‘गुरुचरित्रसप्ताह’ असे म्हणतात. भजन, पूजन आणि विशेष करून कीर्तन इत्यादी भक्तीचे प्रकार प्रचारात आहेत. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.
दत्तात्रेयांमध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम असणे
‘भगवान दत्तात्रेय म्हणजे ‘’ब्रह्मा, विष्णु आणि महेश’’ या त्रिमूर्तींचे रूप. ब्रह्मदेव ज्ञानस्वरूप, श्रीविष्णु वात्सल्यस्वरूप आणि शिव वैराग्यस्वरूप आहे. अशा त्रिमूर्तींचे एकत्रित रूप असणार्या दत्तात्रेयांमध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम झालेला आहे. भगवान दत्तात्रेयांमध्ये वैराग्य असल्यामुळे ते संन्यस्त जीवन व्यतीत करतात.