काणकोण, २७ डिसेंबर (वार्ता.) काणकोण येथील तिर्वाळ-मार्ली या रस्त्याला गोवा मुक्तीनंतर तब्बल ६० वर्षांनी संमती मिळाली आहे. मार्ली हा काणकोण तालुक्यातील अत्यंत मागास भागातील वाडा असून येथील विद्यार्थी, आजारी आणि वयोवृद्ध व्यक्ती यांना येथील खड्डेमय रस्ता आणि वाहतूक व्यवस्थेचा अभाव यांमुळे पुष्कळ त्रास होतात. पावसाळ्यात तर येथील संपूर्ण जीवन विस्कळीत होते. शिवाय या अडीच ते तीन किलोमीटर खडकाळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडी आणि वन्य प्राण्यांची वर्दळ असल्यामुळे या जंगलातून चालत जाणे अत्यंत भीतीदायक ठरते. या वाड्यावर वीज आणि पाणी यांची सुविधाही गेल्या ७-८ वर्षांत आमदार अन् उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाली आहे. गेली ६० वर्षें येथील लोक रस्ता होण्याची प्रतीक्षा करत आहेत. या वाड्यावर एक प्राथमिक शाळा आहे; परंतु पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पैंगीण येथील श्रद्धानंद विद्यालय, आमोणे येथील बलराम विद्यालय किंवा माशे, लोलये, काणकोण येथील विद्यालय किंवा उच्चमाध्यमिक विद्यालय येथे जावे लागते. रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना सकाळी साडेपाच वाजता रानातून चालत जाऊन बस पकडावी लागते.
अडीचशेहून अधिक लोकवस्ती असलेल्या या वाड्यावरील २१० मतदारांनी रस्त्याच्या मागणीसाठी गेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. त्या वेळी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी या लोकांना भेटून त्यांची अडचण समजून घेऊन रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. (लोकांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासनाला जाग येते, याचे हे उदाहरण ! – संपादक) सध्याचे आमदार आणि उपसभापती इजिदोर फर्नांडीस, माजी मंत्री अन् अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष रमेश तवडकर या सर्वांच्या प्रयत्नातून केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने या रस्त्याच्या उभारणीला वनखात्याच्या अभयारण्य विभागाकडून संमती मिळवून दिली आहे. आवश्यक नियमांचे काटेकोरपणे पालन करून एका वर्षभरात या रस्त्याची उभारणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.