घरोघरी भेट देणार्या शिक्षकांची कोरोनाची चाचणी करण्याची मागणी
कणकवली – जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत पालक मुलांना प्राथमिक शाळेत पाठवणार नाहीत. आमचाही त्याला विरोध असेल, तसेच शिक्षकांना जर गृहभेटी देऊन शिक्षण देण्याची सक्ती होत असेल, तर त्याआधी त्या शिक्षकांची कोरोना चाचणी शिक्षण विभागाने करून घ्यावी, अशी मागणी कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
पंचायत समितीतील सभापतींच्या दालनात ही पत्रकार परिषद झाली. या वेळी उपसभापती दिव्या पेडणेकर, गटविकास अधिकारी अनिल चव्हाण, गट शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर आणि सदस्य उपस्थित होते.
या वेळी तळेकर म्हणाले,
१. कणकवली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग थांबलेला नाही. तालुक्यात सद्यःस्थितीत ७० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत, तसेच ५ शिक्षकांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे. अशा स्थितीत प्राथमिक शाळा चालू करणे धोक्याचे आहे.
२. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली पंचायत समितीने ‘शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम २३ जूनपासून चालू केला, तर ७ ऑक्टोबरला विद्यार्थ्यांची मूल्यमापन चाचणी घेण्यात आली. सध्या अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे ‘ऑनलाईन’ धडे देत आहेत.
३. आता शिक्षणाधिकार्यांनी शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती सक्तीची केली आहे, तर मुलांच्या पालकांशी संवाद साधण्यासाठी घरोघरी जाऊन भेट द्यावी, अशा सूचना केल्या आहेत. मग शिक्षक जर विद्यार्थ्यांपर्यंत किंवा त्यांच्या पालकांपर्यंत पोचत असतील, तर त्यांची कोरोना चाचणी झाली पाहिजे.
४. शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा चालू करण्यापूर्वी माध्यमिक शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तसा प्राथमिक शिक्षणाविषयी शासनाने कोणताही निर्णय केलेला नाही. जोपर्यंत शासन या काळात शाळा चालू करण्याचा निर्णय घोषित करत नाही. तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणे धोकादायक आहे.
सिंधुदुर्गात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली १. गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण ४६ २. आतापर्यंत बरे झालेले रुग्ण ५ सहस्र १६१ ३. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ५ सहस्र ६८० ४. आतापर्यंत १५१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ५. उपचार चालू असलेले रुग्ण ३६२ |