कोल्हापूर – पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची पुण्यात बैठक संपन्न झाली. या वेळी सरकार दरबारी ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य होण्यासाठी सहकार्य करणार्या उमेदवाराला ब्राह्मण समाज साहाय्य करेल, असा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती ब्रह्म महाशिखर परिषदेचे प्रवक्ते श्री. विश्वजीत देशपांडे यांनी दिली.
या संदर्भात श्री. मकरंद कुलकर्णी म्हणाले, १० वर्षे आम्ही पाहतोय की, राज्यातील राजकीय पक्ष आमच्या मागण्यांविषयी उदासीन आहेत. ब्राह्मण समाजातील गोरगरीब नागरिकांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे; परंतु पक्षाने आम्हाला गृहीत धरल्याने आमची कुचंबणा होत आहे. त्यामुळे यापुढे जो पक्ष आम्हाला आमच्या मागण्या सदनात मान्य होण्यासाठी प्रत्यक्ष सहकार्य करेल त्याच पक्षाला आमचा पाठिंबा असेल.
या वेळी सर्वश्री ऋषिकेश सुमंत, शिवप्रसाद मुळे, तुषार निंबर्गी, ज्ञानेश्वर पंचवाघ, सुरज कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, विजय जमदग्नी, विद्याधर कुलकर्णी, नीलेश कुलकर्णी उपस्थित होते.