कॅनडामधील परकीय हस्तक्षेपाच्या प्रकरणांत भारताच्या सहभागाचे पुरावे नाहीत ! – Canada Police chief

कॅनडाच्या राष्ट्रीय पोलीस दलाच्या प्रमुखांनी केले स्पष्ट

कॅनडाच्या राष्ट्रीय पोलीस दलाचे प्रमुख माईक दुहेम

ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या राष्ट्रीय पोलीस दलाचे प्रमुख माईक दुहेम यांनी स्पष्ट केले आहे की, ‘कॅनडामध्ये कथित परकीय हस्तक्षेपाच्या प्रकरणांमध्ये भारत सरकारचा थेट संबंध असल्याचे सध्या कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.’ या विधानामुळे दोन्ही देशांतील तणाव काही प्रमाणात अल्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि अन्वेषण पूर्ण होईपर्यंत परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होणार नाही, असे तज्ञांचे मत आहे.

अन्वेषण चालूच आहे !

पोलीस प्रमुखांनी सांगितले की, विविध परकीय हस्तक्षेपाच्या आरोपांची चौकशी चालू आहे; मात्र अन्वेणाच्या काळात भारत सरकार किंवा भारतीय अधिकारी यांचा थेट सहभाग सिद्ध करणारे पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. अन्वेषण प्रक्रियेत गुप्तचर माहिती, आर्थिक व्यवहार, संघटनांचे संबंध आणि वैयक्तिक संपर्क यांचा अभ्यास केला जात आहे. अन्वेषण चालूच असून नव्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या कोणत्याही परकीय हस्तक्षेपाविरुद्ध कठोर उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारत-कॅनडा तणावाची पार्श्वभूमी

कॅनडामध्ये खलिस्तान आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येनंतर भारतावर संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. परस्पर आरोप-प्रत्यारोप, राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी आणि व्यापार-सुरक्षा सहकार्यावर परिणाम झाला.

भारताने यापूर्वीच अशा सर्व आरोपांना फेटाळले असून ते राजकीय प्रेरित असल्याचे म्हटले आहे. भारताने कॅनडामधील भारतविरोधी आणि आतंकवादी प्रवृत्तीच्या गटांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.