वाचकांना निवेदन : दैनिक सनातन प्रभातमधील आध्यात्मिक परिभाषांचा अर्थ

संपादकांचा वैज्ञानिक दृष्टीकोन
‘दैनिक सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावरील कोणतेही लिखाण अथवा अन्य साहित्य वाचकाला ‘राज्यघटनेच्या कलम ५१ अ नुसार वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवण्याला’ बाधा आणण्यासाठी लिहिलेले वा ठेवलेले नाही. राज्यघटनेने कलम २५ नुसार व्यक्तीला धर्मपालनाचा आणि धर्मप्रसाराचा अधिकार दिला आहे. न्यायालयांच्या अनेक निवाड्यांतून स्पष्ट झाले आहे की, धार्मिक भावना वरपांगी कशाही वाटल्या, तरी त्यांत ढवळाढवळ करण्याचा अधिकार शासन अथवा न्यायालय यांना नाही. तसेच ही ढवळाढवळ केवळ सामाजिक शांतता, नैतिकता आणि आरोग्य धोक्यात येत असेल, तरच करता येते. या संकेतस्थळावरील लेख अथवा अन्य साहित्य हे या तिन्ही गोष्टींना धोक्यात आणण्यासाठी लिहिलेले नसून घटनात्मक अधिकाराचा वापर करत अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी आणि धर्माचरण सांगण्यासाठी देण्यात आलेले आहेत.

श्रद्धेने धर्माचरण केल्यास धर्मासंबंधी विविध अनुभव येतात, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. धर्म आणि श्रद्धा या गोष्टी वैयक्तिक असल्याने या संकेतस्थळावर दिलेले अनुभवसुद्धा वैयक्तिकच आहेत. त्यामुळे ते सरसकट लागू होतील अथवा सर्वांनाच ते येतील, असे नाही. समाजात अंधश्रद्धा पसरवण्यासाठी किंवा वैद्यकीय उपचारांना किंवा वैज्ञानिक दृष्टीकोनांना विरोध करण्यासाठीही हे लिखाण नाही. वाचकाने डोळसपणे संकेतस्थळाच्या लेखांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे, याची कृपया नोंद घ्यावी. – संपादक

 

संकेतस्थळावर वापरलेल्या काही आध्यात्मिक परिभाषांचे अर्थ
अनुभूती : या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या अथवा हिंदुत्वनिष्ठांच्या अथवा वाचकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र असे म्हणतात.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते, याची चाचणी करतात. याला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग म्हणतात.

आध्यात्मिक उपाय
एखाद्याच्या मनात पुष्कळ विचार येत असतांना, मन एकाग्र होत नसतांना, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा अशांत वाटत असतांना नामजप, ध्यानधारणा, प्राणायाम, मंत्रजप, प्रार्थना इत्यादी आध्यात्मिक कृती केल्यामुळे साधकाचे मन स्थिरावते किंवा प्रसन्न होते. या आध्यात्मिक कृतींना ‘आध्यात्मिक उपाय’ असे म्हणतात.

संकेतस्थळावरील टक्केवारीची भाषा
अध्यात्म वैज्ञानिक परिभाषेत कळावे, यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ असलेल्या प.पू. डॉ. जयंत आठवले (संकलक) यांनी संकेतस्थळावरील ग्रंथांच्या लेखांत आणि अन्य साहित्यांत काही गोष्टींतील विविध घटकांचे प्रमाण टक्केवारीच्या भाषेत सांगितले आहे, उदा. थोडे, मध्यम आणि अधिक यांना त्यांच्या प्रमाणानुसार अनुक्रमे १ ते ३० टक्के, ३१ ते ६० टक्के आणि ६१ ते १०० टक्के म्हटले आहे.

साधकांना स्फुरणारे ज्ञान, ही त्यांची अध्यात्मातील प्रतिभा जागृत झाल्याची अनुभूती !
सनातनचे काही साधक अनेक वर्षे साधना (तप) करत असल्याने त्यांची अध्यात्मातील प्रतिभा जागृत होऊन त्यांना विविध विषयांवर ‘ज्ञान’ स्फुरत आहे. ही अनुभूतीच आहे. अनुभूती येण्याच्या संदर्भातील धर्मशास्त्रीय आधार पुढीलप्रमाणे –

ततः प्रातिभश्रावणवेदनादर्शास्वादवार्ता जायन्ते । – पातञ्जलयोगदर्शन, पाद ३, सूत्र ३६

अर्थ : आत्म्याच्या ठिकाणी संयम (योगाभ्यास वा ध्यान) केल्याने प्रतिभासामर्थ्यामुळे सूक्ष्म, व्यवहित (लपलेल्या) किंवा अतिदूर वस्तूंचे ज्ञान होणे (अंतर्दृष्टी प्राप्त होणे), दिव्य (दैवी) नाद ऐकू येणे, दिव्य स्पर्श कळणे, दिव्य रूप दिसणे, दिव्य रसाची गोडी चाखता येणे आणि दिव्य गंध समजणे या सिद्धी प्राप्त होतात.

विश्लेषण : सनातनच्या काही साधकांना श्लोकात वर्णिल्याप्रमाणे एखाद्या विषयाशी संबंधित चिंतन केलेले नसतांना त्याविषयी प्रतिभा जागृत होऊन ज्ञान स्फुरणे, दिव्य नाद ऐकू येणे, सूक्ष्म रूप (सूक्ष्म-चित्र) दिसणे इत्यादी विविध प्रकारच्या अनुभूती येत आहेत.

यावरून साधकांना स्फुरणारे ज्ञान असो कि योगाभ्यासातून साधकांची जागृत होणारी अंतर्दृष्टी असो, या दोहोंना धर्मशास्त्रीय आधार आहे, हे सिद्ध होते.

ज्ञान मिळणार्‍या साधकांचा नम्रपणा !
यासंदर्भात ‘हे ज्ञान माझे नसून हे साक्षात् ईश्वरी ज्ञान आहे’, असा संबंधित साधकांचा भाव असतो. अहंकार वाढू नये, यासाठी ते ज्ञानाच्या लिखाणाच्या शेवटी स्वतःचे नाव न लिहिता स्वतःच्या श्रद्धास्थानाचे नाव लिहितात आणि कंसात स्वतः माध्यम असल्याचे लिहितात, उदा. सूक्ष्मजगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून). सूक्ष्मजगतातील ‘एक विद्वान’ त्यांना ज्ञान देतात, असा सौ. अंजली गाडगीळ यांचा भाव असतो.

एखाद्या विषयासंबंधी लिहितांना त्रासदायक वाटल्यास ते ज्ञानाच्या शेवटी स्वतःचे नाव घालण्यापेक्षा ‘एक मांत्रिक’ अशा प्रकारे लिहितात आणि कंसात स्वतः माध्यम असल्याचे लिहितात.

‘वाईट शक्तींचा साधकांना होणारा त्रास’ या संज्ञेचा अर्थ
वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. साधना केल्याने साधकाकडे चांगल्या शक्ती आकृष्ट होतात. साधनेमुळे वातावरणातील चांगल्या शक्तीचे आधिक्यही वाढते आणि वाईट शक्तींची शक्ती घटते. असे होऊ नये, यासाठी वाईट शक्ती साधकांच्या साधनेत विघ्ने आणतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत.’ (टीप १) त्यापैकी एक मंत्र पुढे दिला आहे.

स्तुवानमग्न आ वह यातुधानं किमीदिनम् ।

त्वं हि देव वनि्दतो हन्ता दस्योर्बभूविथ ।। – अथर्ववेद, कांड १, सूक्त ७, खंड १

अर्थ : सर्वांमध्ये जठराग्नीच्या रूपात रहाणार्‍या, वीज इत्यादी रूपांत सर्व जग व्यापणार्‍या आणि यज्ञामध्ये अग्रणी असणार्‍या हे अग्ने, आम्ही ज्या देवतांची स्तुती करत आहोत, त्यांच्यापर्यंत तू हा हविर्भाग पोहोचव. आम्ही दिलेल्या हविर्भागाची प्रशंसा करणार्‍या देवतांना आमच्या जवळ आण आणि आम्हाला मारण्याची इच्छा करत गुप्त रूपाने (सूक्ष्म रूपाने) फिरणार्‍या किमीदिन्ला (दुष्ट पिशाचांचा एक प्रकार) आमच्यापासून दूर ने; कारण हे दान इत्यादी गुणांनी युक्त अशा देवा, आम्ही वंदन केल्यावर तू उपक्षय (घात) करणार्‍या यातुधान (राक्षस) इत्यादींचा संहार करतोस; म्हणून तू याला (या राक्षसाला) तुझ्याजवळ बोलव. किंवा हे स्तूयमान अग्ने, प्रतिकार करण्यासाठी (प्रतिशोध घेण्यासाठी) तू या राक्षसाचा या पुरुषामध्ये आवेश कर.

तात्पर्य, वाईट शक्ती साधना करणार्‍यांना त्रास देतात आणि या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. संकेतस्थळावरील लेखांमध्ये आणि अन्य साहित्यामध्ये काही ठिकाणी ‘वाईट शक्ती’ किंवा ‘आध्यात्मिक त्रास’ हे शब्द वापरले आहेत. ते या विषयाला अनुसरूनच आहेत.

टीप १ – संदर्भ : मराठी विश्वकोश खंड १, प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, सचिवालय, मुंबई – ४०००३२, आवृत्ती १ (१९७६), पृष्ठ १९४)