
१. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे एकत्र बसून नामजप केल्यावर समष्टीचा लाभ अनुभवल्याने गुरुपौर्णिमेच्या काळात एकत्रितपणे भावजागृतीचा प्रयोग करण्याचे ठरवणे
‘मे २०२५ मध्ये ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या कालावधीत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितले होते, ‘‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य यांच्याशी संबंधित सेवांमध्ये अडचणी येऊ नयेत’, यासाठी संगीत विभागातील सर्व साधकांनी प्रतिदिन १० मिनिटे एकत्र बसून ‘शून्य’ हा नामजप करावा.’’ त्याप्रमाणे आम्ही सर्व साधक प्रतिदिन एकत्र बसून नामजप करत होतो. त्या वेळी आम्हाला समष्टीचा लाभ अनुभवता आला. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या ३ आठवडे आधी आम्ही एकत्र बसून भावजागृतीचा प्रयोग करण्याचे ठरवले.
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी शोधलेल्या उपायपद्धतीचा साधकांना आध्यात्मिक त्रासाच्या निवारणासाठी लाभ होत असणे
‘हे लिखाण करत असतांना मला वाटले, ‘प्रत्येक गोष्टीसाठी काळ हेच औषध आहे. ज्या साधकांना पूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास होता, त्या साधकांचा आध्यात्मिक त्रास आता न्यून होत आहे. काही जणांचा त्रास न्यून झालाही आहे’, याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी आणि नामजपादी उपाय सांगणार्या सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांनी जी उपायपद्धत शोधून काढली आहे, त्यानुसार उपाय केल्याने तीव्र त्रास असणार्या सर्वच साधकांना त्रासाच्या निवारणासाठी लाभ होत आहे. याचीच अनुभूती, म्हणजे मलाही या वेळी भावजागृतीचे प्रयोग अनुभवता आले.’ – सौ. भक्ती कुलकर्णी, (१४.७.२०२५)
२. प्रतिदिन एकत्रित बसून भावजागृतीचा प्रयोग करणे आणि विभागाच्या ‘व्हॉट्सॲप’ गटावर सर्व साधकांना भावजागृतीचा एक प्रयोग पाठवणे

या काळात प्रतिदिन विभागातील एकेक साधक भावजागृतीचा वेगवेगळा प्रयोग घेत असे, तसेच वैयक्तिक स्तरावर दिवसभरात भाव अनुभवण्यासाठी विभागाच्या ‘व्हॉट्सॲप’ गटावर प्रतिदिन भावजागृतीचा एक प्रयोग पाठवण्याची सेवा माझ्याकडे होती. यामध्ये ‘शरिरावरचे काळे आवरण काढतांना आणि न्यास करतांना ‘आपला हात हा श्रीकृष्णाचा हात आहे’, असा भाव ठेवणे’, ‘श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र आपल्या मस्तकावर आहे अन् त्यातून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा वर्षाव आपल्यावर होत आहे’, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विराट रूपासमोर आपण नतमस्तक झालो आहोत’, असे छोटे भावजागृतीचे प्रयोग मी पाठवत असे.
३. साधकांनी एकत्रित बसून केलेल्या भावजागृतीच्या प्रयोगांचे विषय
साधकांनी एकत्रितपणे करण्याच्या भावजागृतीच्या प्रयोगांमध्ये आम्ही प्रथम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संदर्भातील प्रयोग घेतले. नंतर ‘चराचरातील व्यापक गुरुतत्त्व अनुभवणे’, हा प्रयोग घेतला. एके दिवशी सोमवार असल्याने कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १८ वर्षे) हिने शिवाच्या संदर्भातील प्रयोग घेतला. तेव्हा सर्वांनाच ‘आपण हिमालयात जाऊन आलो’, असे वाटले आणि सर्वांना शिवाचे तत्त्व अधिक प्रमाणात अनुभवता आले. त्यानंतर साधकांनी ज्या दिवशी ज्या देवाचा वार असेल, त्या देवाच्या संदर्भातील भावजागृतीचे प्रयोग घेतले. त्यामुळे त्या त्या दिवशी त्या त्या देवतेचे तत्त्व सर्वांना अनुभवायला मिळत होते.
४. भावजागृतीच्या वरील प्रयोगांच्या वेळी साधकांनी अनुभवलेले वेगळेपण !
४ अ. शांतीची अनुभूती येणे : पूर्वी भावजागृतीचा प्रयोग झाल्यावर साधकांना ‘भावजागृती होणे, मन निर्विचार होणे, चैतन्य जाणवणे’, अशा अनुभूती येत होत्या. आता घेतलेल्या भावजागृतीच्या प्रयोगांनंतर सर्वांनाच शांतीची अनुभूती अधिक प्रमाणात येऊ लागली. हे वेगळेपण भगवंताच्या कृपेने साधकांना अनुभवता आले.
४ आ. प्रयोगानंतर ध्यानस्थिती अनुभवणे आणि भाव टिकून रहाण्यास साहाय्य होणे : जेव्हा भावजागृतीचे प्रयोग चालू केले, तेव्हा आरंभी साधकांचे आत्मनिवेदन भावाच्या स्तरावर होत होते. नंतर भावजागृतीचा प्रयोग झाल्यावर सर्व जण शून्यावस्थेत असल्याने कुणालाच लगेच बोलायला शब्द सुचत नव्हते. सर्व जण थोडा वेळ ध्यानस्थितीत असायचे. ४ – ५ मिनिटांनी जागृत स्थितीत आल्यावर साधक त्यांनी अनुभवलेल्या भावक्षणांचे आत्मनिवेदन करायचे. ‘पूर्वीच्या तुलनेत आताचे प्रयोग निर्गुण स्तरावरील असल्याने भाव टिकून रहाण्यास साहाय्य झाले’, असे आम्हाला जाणवले.
४ इ. भावजागृतीचा प्रयोग झाल्यावर साधक ‘प्रयोगात काय जाणवले ?’, याचे आत्मनिवेदन करत होते. तेव्हा प्रत्येकाला वेगवेगळी भावावस्था अनुभवता येत होती.
४ ई. सर्व साधक ‘उद्या भावजागृतीचा कोणता प्रयोग असेल ?’, याची उत्सुकतेने वाट पहात असत.
५. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पूजनाविषयीच्या भावजागृतीच्या प्रयोगानंतर साधकांनी वेगळेच भावविश्व अनुभवणे
१०.७.२०२५ या दिवशी गुरुपौर्णिमा होती. तेजलताईने (सुश्री तेजल पात्रीकर, आध्यात्मिक पातळी ६० टक्के) ‘गुरुपौर्णिमेनिमित्त सभागृहात साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आले आहेत. संगीत विभागाच्या साधकांना भावपूर्ण गुरुपूजन करण्याची अमूल्य संधी लाभली आहे’, असा भावजागृतीचा प्रयोग घेतला. प्रयोगामध्ये ‘खरोखरच गुरुदेवांचे आशीर्वचन साधकांना लाभले’, असे साधकांनी अनुभवले. प्रयोग झाल्यानंतर सर्वांच्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते. सर्व जण एका वेगळ्याच भावविश्वात जाऊन निःशब्द झाले होते. ‘प्रयोगाच्या माध्यमातून प्रतिदिन आपला भाव गुरुचरणांपर्यंत पोचावा’, यासाठी सर्व साधक व्रत करत होते. ‘या व्रताचे उद्यापन (समाप्ती) गुरुपौर्णिमेनिमित्तच्या या भावजागृतीच्या प्रयोगाने झाले’, असे सर्व साधकांना वाटले.
६. भावजागृतीचे प्रयोग केल्यानंतर साधकांना स्वतःत जाणवलेले पालट !
अ. ‘मला माझी अंतर्मुखता वाढण्यास आणि भावस्थितीत रहाण्यास साहाय्य झाले. ‘भावजागृतीचा प्रयोग झाल्यानंतर दुसर्या दिवशी दुसर्या प्रयोगापर्यंत ती ऊर्जा टिकते’, असे मला जाणवले.’ – कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १८ वर्षे)
आ. ‘माझ्यात उत्साह निर्माण झाला. माझ्याकडून दिवसभरात भावजागृतीचे अधिकाधिक प्रयत्न होऊ लागले.’ – सौ. रेणुका क्राक
इ. ‘गटावर भावजागृतीचा प्रतिदिन एक प्रयोग पाठवल्याने साधनेच्या प्रयत्नांसाठी एक ध्येय मिळायचे. तो प्रयोग केल्याने मला स्थिरता जाणवायची.’ – सौ. शुभांगी शेळके
ई. ‘मी घरी असल्याने भावजागृतीच्या प्रयोगात ‘ऑनलाईन’ सहभागी होत होते. घरी सतत भावस्थितीत रहाणे कठीण असते. भावजागृतीचे प्रयोग केल्यामुळे माझ्या मनाची स्थिती चांगली रहात असे. ‘भावजागृतीसाठीचे प्रयत्न सांघिकरित्या केल्यामुळे त्याचा जास्त लाभ होतो’, असे मला जाणवले. या प्रयोगांमुळे कृतींना भावाची जोड देण्यास साहाय्य झाले. त्यामुळे माझ्या मनाला स्थिरता आणि हलकेपणा जाणवत असे. घरी घडणार्या प्रसंगांना मला सहजतेने सामोरे जाता येत असे.’ – सौ. सावित्री इचलकरंजीकर
उ. ‘पूर्वी मला आध्यात्मिक त्रासामुळे भावजागृतीचा प्रयोग काही प्रमाणातच अनुभवता येत होता. कधी कधी प्रयोग करतांना आध्यात्मिक त्रासामुळे माझ्या मनात विचारांचे प्रमाण पुष्कळ असायचे. त्यामुळे भावजागृतीचा प्रयोग अनुभवता न आल्याने मला निराशा येत होती. आम्ही एकत्र येऊन भावजागृतीचा प्रयोग केले. तेव्हा प्रयोग अनुभवतांना मला आनंद जाणवायचा आणि शांत वाटायचे.’ – सौ. भक्ती कुलकर्णी
७. एका साधकाने ‘संगीत विभागातील सर्व साधक आनंदी दिसतात’, असे सांगणे आणि त्या माध्यमातून गुरुदेवांनी प्रोत्साहन दिले’, असे जाणवणे
विभागात भावजागृतीचे प्रयोग चालू असतांना एके दिवशी श्री. सुरेश कदम हे संगीत विभागात आले होते. ते मला म्हणाले, ‘‘तुमच्या विभागातील साधकांना पाहून चांगले वाटते. सर्वांमध्ये संघटितपणा जाणवतो. सर्व जण आनंदी दिसतात.’’ ‘त्यांच्या माध्यमातून जणू गुरुदेवांनीच आम्हाला भावजागृतीच्या प्रयत्नांसाठी प्रोत्साहन दिले’, असे मला वाटले.
७ अ. साधकाने केलेल्या कौतुकाच्या प्रसंगातून शिकायला मिळालेली सूत्रे
१. ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’, म्हणजे कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते.’ जेव्हा आपण संघटित होऊन प्रयत्न करतो, तेव्हा फलनिष्पत्ती चांगली मिळते आणि सर्वांनाच त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. या माध्यमातून कुटुंबभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.
२. ‘भावस्थितीत रहाणे’, ही देवाने आपत्काळात जगण्यासाठी आपल्याला दिलेली संजीवनी आहे’, असे मला जाणवले.
३. प्रत्येक साधकाचे भावविश्व वेगळे असते. जेव्हा आपण एकटेच भावजागृतीचा प्रयोग करतो, तेव्हा मर्यादित भाव अनुभवतो. एकत्र भावजागृतीचा प्रयोग करतांना प्रयोग घेणारा प्रत्येक साधक इतर साधकांना त्याच्या भावविश्वात घेऊन जात असल्याने आपल्याला भावाची अनेक अंगे अनुभवायला मिळतात. त्यामुळेच ‘समष्टीमध्ये अधिक आनंद आहे’, हे सूत्र माझ्या मनावर कोरले गेले आणि माझ्याकडून सर्व साधकांमधील गुरुतत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला हे सर्व लिखाण करण्याची बुद्धी दिली आणि माझ्याकडून ते करून घेतले’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. ‘हे गुरुदेवा, ‘आम्हा सर्व साधकांना भावस्थितीत रहाता येऊ दे’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. भक्ती कुलकर्णी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.७.२०२५)
|
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !