श्रीकृष्णाने भीष्माचार्यांना ‘प्रत्येकाला प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागते’, हा विधीनियम सांगणे

‘भीष्म पितामह रणभूमीवर शरशय्येवर पडले होते. शरिराची थोडी जरी हालचाल झाली, तरी त्यांच्या शरिरात घुसलेल्या बाणांमुळे त्यांना अत्यंत वेदना होऊन रक्ताची धार वहात असे. अशा स्थितीत त्यांच्या दर्शनाला सर्व जण ये-जा करत होते. एकदा श्रीकृष्णसुद्धा त्यांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यांना पाहून भीष्म मोठ्याने हसले. त्यांच्यात झालेला संवाद पुढे दिला आहे.

भीष्म : यावे जगन्नाथ, आपण तर सर्वज्ञ आहात. आपण सर्व जाणता. मला सांगा की, मी असे कोणते पाप केले होते, ज्याची मला एवढी भयंकर शिक्षा भोगावी लागत आहे ?

कृष्ण : पितामह, आपल्याकडे ती शक्ती आहे. आपण आपले पूर्वजन्म पाहू शकता. आपण स्वतःच पहायचे होते.

भीष्म : देवकीनंदन, येथे मी एकटाच पडून आहे आणि दुसरे मी काय करू शकतो ! मी सर्व पाहिले, आतापर्यंत मी १०० जन्म पाहिले आहेत. त्या १०० जन्मांमध्ये मी एकही असे कर्म केलेले नाही, ज्याचा असा परिणाम होईल की, माझे संपूर्ण शरीर घायाळ होऊन पडेल. येणारा प्रत्येक क्षण अधिक वेदना घेऊन येतो.

कृष्ण : पितामह, आपण एक जन्म आणखी मागे जावे. आपल्याला उत्तर मिळून जाईल.

त्यानंतर भीष्माने ध्यान लावले आणि पाहिले की, १०१ जन्मापूर्वी ते एका नगराचे राजा होते. एकदा मार्गावरून ते आपल्या सैनिकांच्या एका तुकडीसह कुठेतरी चालले होते. त्या वेळी एक सैनिक त्यांच्या पुढे धावत आला आणि म्हणाला, ‘‘राजन्, मार्गामध्ये एक सर्प पडला आहे. जर आपली तुकडी त्यावरून गेली, तर तो मरून जाईल.’’ भीष्म त्याला म्हणाले, ‘‘एक काम करा. त्याला एखाद्या काठीने गुंडाळून झाडीमध्ये फेकून द्या.’’ सैनिकाने तसेच केले. त्या सापाला एका बाणाच्या टोकाने उचलून झाडींमध्ये फेकून दिले. दुर्भाग्याने ते झाड काटेरी होते. साप त्या काट्यांमध्ये अडकला गेला. तो साप त्यातून निघण्यासाठी जेवढा प्रयत्न करत होता, तेवढा अधिक तो त्यात अडकला जात होता. त्याच्या अंगात काटे घुसले गेले. भळाभळा रक्त वाहू लागले. त्यामुळे झाडींमध्ये असलेल्या मुंग्या त्याचे रक्त पिऊ लागल्या. हळूहळू तो मृत्यूच्या मुखात जाऊ लागला. ५ – ६ दिवस तडफडल्यानंतर त्याचे प्राण गेले. हे ध्यानात पाहिल्यावर भीष्मांनी श्रीकृष्णाला प्रश्न विचारला.

भीष्म : हे त्रिलोकीनाथ, आपण जाणताच की, मी हे कर्म जाणूनबुजून केले नाही. उलट माझा हेतू सापाचे रक्षण व्हावे, असा होता. तरीसुद्धा हा परिणाम कसा काय झाला ?

कृष्ण : पितामह, आपण जाणूनबुजून कर्म करो किंवा अज्ञानवश करो; परंतु शेवटी कर्म झालेच ना ! त्या सापाचे प्राण तर गेलेच ना ! विधीचा नियम आहे की, आपण जे कर्म करतो, त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागते. आपले पुण्यबळ एवढे अधिक होते की, त्या पापाचे फळ पिकण्यास १०१ जन्म लागले; परंतु शेवटी ते फलित झाले.’

– डॉ. ओमशंकरजी गुप्ता

(साभार : मासिक ‘कल्याण’, सप्टेंबर २०२१)