रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून नामजप करत असतांना साधिकेने केलेला भावजागृतीचा प्रयोग आणि अनुभवलेला भावानंद !

‘१८.३.२०२२ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्‍हा गुरुदेवांच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) कृपेने मी केलेला भावजागृतीचा प्रयोग येथे दिला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. मन गुरुचरणी स्‍थिर होणे आणि ‘भावानंद मिळणार आहे’, या विचाराने मन प्रफुल्लित होणे 

‘मी डोळे बंद करून मन शांत करण्‍याचा प्रयत्न करत आहे. मी इकडे-तिकडे सातत्‍याने फिरणार्‍या मनाला श्री गुरुचरणी विश्रांती घेण्‍याची विनंती करत आहे. माझे मन गुरुचरणी स्‍थिर झाले आहे. ‘आज मला कुठला भावानंद मिळणार आहे ?’, या विचाराने माझे मन प्रफुल्लित झाले. हा भावानंद, म्‍हणजे माझ्‍यासाठी खाऊच आहे. त्‍यामुळे माझ्‍यात भाववृद्धी होऊन मला श्रीकृष्‍ण आणि श्री गुरुदेव यांच्‍याशी एकरूपता साध्‍य करता येणार आहे.

सौ. निवेदिता जोशी

२. श्रीकृष्‍णाने चैतन्‍याचा निळा पारदर्शक गोळा पाठवणे आणि त्‍यात बसून साधिकेला श्रीकृष्‍णाच्‍या कृपेने झालेले विविध ठिकाणांचे दर्शन !

२ अ. साधिकेने गोळ्‍यात पांढर्‍या शुभ्र लहान चैतन्‍य कणाच्‍या रूपात प्रवेश करणे : मी बसले आहे, त्‍या ठिकाणी श्रीकृष्‍णाने एक चैतन्‍याचा निळा पारदर्शक गोळा पाठवला आहे. तो गोळा सुंदर अशा काचेच्‍या गोटीप्रमाणे दिसत आहे. त्‍या निळसर रंगाच्‍या गोळ्‍यामध्‍ये गुलाबी, मोरपंखी आणि पिवळा या रंगांचे लहानसे चैतन्‍य कण प्रकाशमान झालेले दिसून येत आहेत. तो गोळा माझ्‍याजवळ आल्‍यावर मला फार आनंद झाला. श्रीकृष्‍णाने मला विचारले, ‘या गोळ्‍यात प्रवेश करायचा का ?’ मी त्‍वरित श्रीकृष्‍णाला होकार दिला. त्‍या क्षणी श्रीकृष्‍णाने त्‍या गोळ्‍याला प्रवेशद्वार सिद्ध केले आणि माझे रूपांतर पांढर्‍या शुभ्र लहान चैतन्‍य कणात केले. मी आत प्रवेश केल्‍याक्षणी माझ्‍या आनंदाला पारावार राहिला नाही, इतके आल्‍हाददायी वातावरण आत होते. श्रीकृष्‍णाने त्‍याचे एक बोट प्रवेशद्वाराच्‍या ठिकाणी लावून ते बंद केले.

२ आ. श्रीकृष्‍णाने साधिकेला भारतभूमीचे दर्शन घडवणे : त्‍या गोळ्‍यात माझ्‍यासाठी आसंदी ठेवली होती. मी त्‍या आसंदीवर बसल्‍यावर माझा नामजप आपोआप चालू झाला. माझा नामजप एकाग्रतेने आणि भावपूर्ण होऊ लागला. माझी भावावस्‍था आणि आनंदावस्‍था पाहून श्रीकृष्‍णाने सांगितले, ‘आज आपण भारतभूमीचे दर्शन घेऊया.’ श्रीकृष्‍णाने तो गोळा हवेत नेला. ते दृश्‍य फारच सुंदर होते.

२ आ १. लवकरच हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना या भूमंडलावर होणार असल्‍याने भारतभूमी आनंदी असणे : आकाशमंडलाच्‍या मध्‍यभागी तो चैतन्‍याचा गोळा स्‍थिरावला. तेव्‍हा मला जाणवले की, संपूर्ण भूमाता आनंदात आहे. एक वेगळाच गंध वातावरणात मिसळला आहे. वायूतत्त्व सर्व साधकांवरील आवरण दूर करत आहे आणि साधकांच्‍या भोवती त्‍या सुगंधाचे संरक्षककवच निर्माण करत आहे. स्‍थुलातून जरी युद्धजन्‍य स्‍थिती असली, तरीही भारतभूमी आनंदी आहे; कारण आता लवकरच हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना या भूमंडलावर होणार आहे. त्‍याची सिद्धता पंचमहाभूते करत आहेत.

२ आ २. श्रीकृष्‍णाच्‍या आज्ञेने हनुमंताने साधिकेला अयोध्‍या नगरीचे दर्शन घडवणे : श्रीकृष्‍णाने मला अयोध्‍या नगरीतील वातावरण दाखवले. आता गुढीपाडवा जवळ येत आहे. ‘अयोध्‍या नगरी श्रीरामाच्‍या स्‍वागतासाठी कशी सिद्ध होत आहे ?’, ते श्रीकृष्‍णाने मला दाखवले. तो आनंद बघून मलाही त्‍यात सहभागी होण्‍याची इच्‍छा झाली. माझी इच्‍छा जाणून श्रीकृष्‍णाने मला तिथे उतरण्‍याची आज्ञा दिली. श्रीकृष्‍णाने हनुमंताला मला अयोध्‍या नगरीचे दर्शन घडवायला सांगितले. हनुमंताने मला संपूर्ण अयोध्‍या नगरीचे दर्शन घडवले. त्‍या ठिकाणी घरोघरी जाऊन मी श्रीरामनाम आणि धर्म यांचा प्रचार केला. मी पुन्‍हा चैतन्‍याच्‍या गोळ्‍यात येऊन बसले.

२ आ ३. साधिकेने श्रीकृष्‍णाकडे ‘गुरुलोक आणि श्री गुरूंचे दर्शन घ्‍यायचे आहे’, अशी इच्‍छा व्‍यक्‍त केल्‍यावर गोळा रामनाथी आश्रमातील गुरुदेवांच्‍या खोलीत येणे अन् गोळा गुरुदेवांशी एकरूप होणे : श्रीकृष्‍णाने मला विचारले, ‘आता काय इच्‍छा आहे ?’ तेव्‍हा मी श्रीकृष्‍णाला सांगितले, ‘मला गुरुलोक बघायचा आहे.’ त्‍याक्षणी तो गोळा रामनाथी आश्रमाच्‍या वरच्‍या बाजूला आला. मला तेथून गुरुलोकाचे दर्शन घडत आहे. ‘प्रीती, ज्ञान, विद्या, सर्व देवतांची कृपा आणि त्‍यांचे आशीर्वाद यांची स्‍पंदने वातावरणात प्रक्षेपित होत आहेत’, असे मी अनुभवत आहे. रामनाथी आश्रम पिवळ्‍या प्रकाशाने प्रकाशमान झाला आहे. मी श्रीकृष्‍णाला प्रार्थना केली, ‘मला श्री गुरूंचे दर्शन घ्‍यायचे आहे.’ त्‍या क्षणी गोळा गुरुदेवांच्‍या खोलीत उतरला आणि गुरुदेवांमध्‍ये सामावून गेला.

३. मी श्री गुरुचरणी बसले आहे आणि हा आनंद दिला; म्‍हणून कृतज्ञता व्‍यक्‍त करत आहे. कोटीशः कृतज्ञता ! गुरुमाऊली कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. निवेदिता जोशी (वर्ष २०२४ मधील आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ५२ वर्षे), नंदुरबार. (३०.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक