सातारा, ३ डिसेंबर (वार्ता.) – येथील बुधवार नाका ते मोळाचा ओढा या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम नगरपालिकेच्या वतीने चालू करण्यात आले आहे. यासाठी जुना पूल जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आला. या वेळी पुलावरून जाणार्या पाणीपुरवठ्याची जलवाहिनी जेसीबीमुळे फुटली आणि सहस्रो लिटर पाणी वाया गेले. (पूल पाडतांना योग्य ती काळजी नगरपालिकेने घेतली नव्हती का ? – संपादक) त्यामुळे परिसरात पुष्कळ पाणी साठले. यामुळे शाहूपुरी आणि आकाशवाणी झोपडपट्टी परिसरातील पाणीपुरवठा बंद होऊन नागरिकांची गैरसोय झाली.
मोळाचा ओढा ते बुधवार नाका या परिसराला जोडणार्या पुलावर अनेक खड्डे पडल्यामुळे तो नादुरुस्त झाला होता. स्थानिक नागरिकांकडून पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली. या मागणीची नोंद घेऊन सातारा नगरपालिकेने हा पूल दुरुस्तीसाठी घेतला आहे. आधीच पाणी कपातीमुळे सातारावासीय त्रस्त झाले असून त्यात पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सातारा नगरपालिकेने लवकरात लवकर या जलवाहिनीची दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.