आज ‘यमदीपदान’ आहे. त्या निमित्ताने…
जन्म-मृत्यू आपल्या हाती नाही. येतांना आणि जातांना देहाला घडणारा प्रवास सुलभ व्हावा; म्हणून आपण प्रार्थना करतो. बाळ जन्माला आले की, म्हटले जाते, ‘बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत.’ यात ‘सुखरूप’ शब्दाला फार महत्त्व आहे. ‘सुखाने प्रवास करतांना रूपाला धक्का न लागता म्हणजेच थोडेही न खरचटता झालेला प्रवास तो सुखरूप प्रवास !’ येतांना जेवढी काळजी तेवढीच जातांनाही काळजी घेणे महत्त्वाचे ! देह संपेल; पण आत्म्याला सद्गती लाभावी; म्हणूनही धर्मशास्त्राने दूरदृष्टीने विचार करून ठेवला आहे.
दीपावलीच्या आनंदाच्या क्षणी यमराजाची आठवण ठेवून त्यालाही कणकेचा एक दिवा धनत्रयोदशी तिथीच्या दिवशी सायंकाळी अर्पण करायचा नियम आखून दिला आहे. त्यात हळद आणि तेल घालून वात लावून दिवा प्रज्वलित करावा. दक्षिण दिशेला दिव्याचे तोंड त्या दिशेने वळवून यमदीपदान करावे. या वेळी ‘अकाली मृत्यूचे भय टळू दे’, अशी प्रार्थना करावी. अर्थात् ही प्रार्थना केवळ एक दिवस नाही, तर प्रतिदिन करायची आहे; कारण मृत्यू काही पूर्वकल्पना देऊन येत नाही; पण तो येतांना आपल्या इच्छा, आकांक्षा अतृप्त नसाव्यात. शरीर दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन मरण येण्यापेक्षा तेही सहज सुलभ यावे, यासाठी एक श्लोक आहे, तो प्रतिदिन म्हणावा, असे म्हटले जाते.
अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम् ।
देहान्ते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वर ॥
अर्थ : ‘हे परमेश्वरा, मला मृत्यू सहजपणे येऊ दे, माझे जीवन कष्टांविना (दैन्याविना) जाऊ दे आणि देहांताच्या वेळी मला तुझे सान्निध्य लाभू दे’, असे म्हटले आहे.
(साभार : दैनिक ‘लोकमत’)