लेबनॉनमधील भारतीय नागरिकांनी बाहेर न पडण्याचा भारताचा सल्ला !
गाझा/तेल अविव (इस्रायल) – लेबनॉनमधील हिजबुल्लाह (Hezbollah) ही आतंकवादी संघटना आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने लेबनॉनमधील त्याच्या नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे (अॅडव्हायझरी) प्रसारित केली आहेत. राजधानी बैरूतमध्ये असलेल्या भारतीय दूतावास कार्यालयाने देशात रहाणार्या आणि तेथे जाऊ इच्छिणार्या भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.
इस्रायलच्या कह्यात असणार्या ‘गोलान हाइट्स’वर हिजबुल्लाहने काही दिवसांपर्वी आक्रमण केले. यात १२ इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. याचा सूड म्हणून इस्रायली सैन्याने दक्षिण आणि पूर्व लेबनॉनमधील गावे अन् शहरे यांवर बॉम्बफेक करून प्रत्युत्तर दिले. इस्रायल हिजबुल्लाहवर मोठ्या प्रमाणावर आक्रमण करण्याची सिद्धता करत असून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तेल अविवमध्ये सुरक्षा मंत्रीमंडळाची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे इराणनेही यासंदर्भात इस्रायलला उघडपणे युद्धाची धमकी दिली आहे.
इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या ड्रोन आक्रमणांत २ जण ठार, तर ३ घायाळ झाले. इस्रायलच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लेबनॉनमधील हवाई सेवा बंद करण्यात आली आहे. बैरूत रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे लेबनॉनमधील एकमेव विमानतळ आहे. याआधी झालेल्या युद्धांच्या वेळीही या विमानतळाला लक्ष्य करण्यात आले होते.
अडचणीत सापडलेल्या लेबनॉनमधील भारतियांसाठी संपर्क !लेबनॉनमधील भारतीय दूतावासाने तेथे रहाणार्या भारतियांना कोणत्याही प्रकारच्या साहाय्यासाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक प्रसारित केला आहे. संपर्क क्रमांक : (+९६१) ७६८६०१२८ ई-मेल आयडी : [email protected] |
कोण आहे हिजबुल्ला संघटना ?
हिजबुल्ला या शब्दाचा अर्थ आहे ‘देवाचा पक्ष’ ! ही संघटना स्वतःला शिया मुसलमानांची राजकीय, सैन्य आणि सामाजिक संघटना म्हणवते. लेबनॉनमधील ही एक शक्तीशाली संघटना आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी याला ‘आतंकवादी संघटना’ घोषित केले आहे.
वर्ष १९८० च्या दशकाच्या आरंभी इस्रायलने लेबनॉन कह्यात घेतले. तेव्हा इराणच्या साहाय्याने ही संघटना अस्तित्वात आली. ‘हमास’ ही सुन्नी मुसलमानांची पॅलेस्टिनी आतंकवादी संघटना आहे, तर इराण समर्थित ‘हिजबुल्ला’ ही शिया मुसलमानांची आतंकवादी संघटना आहे; मात्र इस्रायलच्या सूत्रावर दोन्ही संघटनांची एकजूट आहे.