प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ! – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

बैठकीसाठी उपस्थित डावीकडून कुमार आशीर्वाद, बोलतांना चंद्रकांत पाटील, गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रणिती शिंदे

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ७ जुलै (वार्ता.) – आषाढ शुक्ल एकादशी सोहळा १७ जुलै या दिवशी होणार असून या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येथे येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पालखी मार्गावर , तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेसे आणि स्वच्छ पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, आरोग्य सुविधांची उपलब्धता करावी. पालखी सोहळ्यांना पालखी मार्गासमवेतच पालखी तळावर कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळा जिल्ह्यात येण्यापूर्वी वारकर्‍यांसाठी सर्व सुविधांची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

आषाढी वारी नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस खासदार प्रणिती शिंदे, आमदार समाधान आवताडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.