Kashi : काशीतील १ सहस्र हिंदु आणि जैन मंदिरे, तसेच गुरुद्वारे यांचा होत आहे जीर्णोद्धार !

पर्यटकांना मंदिरे आणि गुरुद्वारे यांची ऑनलाईन माहिती मिळणार

वाराणसी (उत्तरप्रदेश) – काशीतील अनुमाने १ सहस्र धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धारांची सिद्धता चालू आहे. हिंदूंच्या मंदिरांव्यतिरिक्त यामध्ये जैन आणि बौद्ध मंदिरे, तसेच गुरुद्वारे यांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना मिळण्याच्या उद्देशाने जीर्णोद्धाराचा प्रयत्न केला जात आहे. जीर्णोद्धार करण्यासह त्यांच्याशी संबंधित माहितीही ऑनलाईन मिळणार आहे. ही धार्मिक स्थळे ‘क्यूआर् कोड’ (‘क्विक रिस्पॉन्स कोड’ म्हणजे बारकोड प्रमाणे असलेली एक प्रकारची सांकेतिक भाषा) प्रणालीने सुसज्ज असतील, जेणेकरून पर्यटकांना तपशीलवार माहिती मिळू शकेल. पहिल्या टप्प्यात ३०० धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे.

१. उपसंचालक पर्यटन आर्.के. रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार काशीतील धार्मिक स्थळे आणि त्यांच्या पौराणिक श्रद्धा यांच्याशी संबंधित साहित्य गोळा करून सर्वेक्षण करून हा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. धार्मिक आणि पुरातत्व तज्ञांकडून माहिती गोळा करण्यासमवेतच ७ महिने भूभागाचे सर्वेक्षण करण्यात आले.

२. दुसर्‍या टप्प्यात काशीतील अनुमाने ७०० मंदिरे आणि वारसा यांची माहिती संकलित करून त्यांना नवसंजीवनी दिली जाणार आहे.

३. पर्यटन विभागाच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, आध्यात्मिक शहर काशी हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. प्रतिदिन लाखो पर्यटक काशीमध्ये येतात. मंदिरे आणि वारसा यांविषयी माहिती नसल्याने पर्यटकांना सर्वत्र जाता येत नाही. पर्यटकांना काशीच्या प्राचीन पौराणिक वैभवाची ओळख व्हावी आणि लोकांना अधिकाधिक पर्यटन स्थळांवर जाता यावे, या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे.

४. पर्यटन विभाग धार्मिक स्थळांजवळ स्टीलचे फलक लावणार आहे. त्यावर या स्थळांचा संक्षिप्त इतिहास असेल. त्यावर एक ‘क्यूआर् कोड’ असेल. त्यात तपशीलवार इतिहास असेल.

संपादकीय भूमिका

काशी भारतातील आध्यात्मिक क्षेत्र असल्याने त्याचा आध्यात्मिक स्तरावरही विकास झाला पाहिजे. हिंदूंसाठी काशी येथे सर्वांत मोठे धर्मशिक्षण केंद्र निर्माण केले पाहिजे !