भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण
मुंबई, २ जुलै (वार्ता.) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत काढलेल्या अपशब्दांचे पडसाद १ जुलै या दिवशी विधान परिषदेमध्येही उमटले होते. या वेळी सभागृहात निषेधाचा ठराव घेण्याच्या कारणावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यात खडाजंगी झाली. ‘अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका आणि शिवीगाळ केली आहे’, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्याअनुषंगाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी अंबादास दानवे यांना ५ दिवसांसाठी निलंबित केले आहे.
२ जुलै या दिवशी अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावरून भाजपचे आमदार आक्रमक झाले होते. आमदार प्रसाद लाड यांनी दानवे यांच्या त्यागपत्राची मागणी केली होती. विधान परिषदेत सत्ताधारी आक्रमक झाले आणि त्यांनी दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी काही वेळासाठी विधान परिषदेचे कामकाज स्थगित केले. त्यानंतर पुन्हा कामकाज चालू झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याविषयी सभागृहात प्रस्ताव मांडला. यानंतर उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी अंबादास दानवे यांना ५ दिवसांसाठी निलंबित केले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केलेल्या स्वतःच्या आक्षेपार्ह विधानाचे समर्थन केले. ते म्हणाले की, मी समोरच्याचे काहीही सहन करणार नाही. मी शिवसैनिक असून त्याच बाण्याने उत्तर दिले आहे. ठाकरे गटानेही दानवे यांची बाजू घेत त्यांचे समर्थन केले आहे.
दानवे यांच्या निलंबनासाठी आमदार प्रसाद लाड यांचे एकट्याचेच आंदोलन !
विधान परिषदेत १ जुलै या दिवशी ‘दानवे यांनी मला शिवीगाळ केली आहे’, असा आरोप लाड यांनी केला होता. ‘शिव्या देणे ही राज्याची संस्कृती नाही. त्यामुळे अंबादास दानवे यांचे निलंबन करण्यात यावे’, अशी मागणी लाड यांनी केली आहे. याच मागणीसाठी त्यांनी २ जुलै या दिवशी विधानभवनाच्या पायर्यांवर एकट्याने आंदोलन केले.
दानवे यांचे निलंबन हे पूर्वनियोजित कारस्थान ! – उद्धव ठाकरे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनावरून संताप व्यक्त करत विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, सभापतींचा निर्णय लोकशाहीविरोधी आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांना एका कटाचा भाग म्हणून निलंबित करण्यात आले आहे. अंबादास दानवे यांना त्यांची भूमिका मांडण्याची संधी द्यायला हवी होती. एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्याचे निलंबन हे पूर्वनियोजित कारस्थान असल्याची महाराष्ट्राच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच वेळ असावी. हा अन्याय महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पहात आहे. दानवे यांनी केलेल्या विधानाविषयी मी माता-भगिनींची क्षमा मागतो.
निलंबनाच्या सूत्रावर विरोधकांना बोलू दिले, तर चुकीचे पाऊल ठरेल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या सूत्रावर बोलण्यासाठी विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही उपसभापतींना आपली बाजू सभागृहात मांडण्याची विनंती केली; मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक पवित्रा घेत म्हणाले, ‘‘निलंबनाच्या सूत्रावर विरोधकांना बोलू दिले, तर ते चुकीचे पाऊल ठरेल. त्यांना आपले मत मांडता येणार नाही.’’ त्यामुळे सभापतींनी विरोधकांना बोलू देण्याची संधी नाकारली.
असा पायंडा पडायला नको ! – डॉ. नीलम गोर्हे, उपसभापती
उपसभापती डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या की, सभागृहात शिवीगाळ करून चुकीचा पायंडा पाडला जात आहे. एक महिला उपसभापती किंवा महिला सदस्य सभागृहात उपस्थित असतांना अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग होणे अयोग्य आहे. अशा प्रकारचे वर्तन विधीमंडळात होत असेल, तर इतर नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांसारख्या ठिकाणी महिलांना काम करणे अवघड होईल.