Postmartam Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शवविच्छेदनाच्या वेळी पुरावे गायब केल्याचा ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे यांच्यावर संशय !

सौजन्य : हिंदुस्थान पोस्ट

पुणे – कल्याणीनगर ‘पोर्शे’ गाडीच्या अपघातातील अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. तावरे यांनीच शवविच्छेदन केले असून त्या प्रकरणात पुरावे गायब केल्याचा त्यांच्यावर संशय आहे, असे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ या संकेतस्थळाने प्रसारित केले आहे.

या वृत्तात पुढे म्हटले आहे की,

१. ससून रुग्णालय हे शासकीय रुग्णालय असल्याने आरोपींची शारीरिक पडताळणी, त्यांची रक्त पडताळणी, हत्या किंवा अपघातामधील मृतांचा शवविच्छेदन अहवाल याच रुग्णालयात सिद्ध केले जातात आणि हे अहवाल न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात.

२. डॉ. दाभोलकर यांची जेव्हा हत्या झाली, तेव्हा त्यांचे शवविच्छेदन डॉ. तावरे यांनीच केले होते. त्यांनी दिलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालावर आरोपींच्या अधिवक्त्यांनी युक्तीवादाच्या वेळी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. या अहवालात उघडपणे लपवाछपवी केल्याचे आरोपींच्या अधिवक्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.

३. शवविच्छेदन करतांना डॉ. दाभोलकरांच्या उजव्या गुडघ्यावरच्या आणि पायाच्या पुढच्या भागावर त्यांच्या नातेवाइकांनी दाखवलेल्या जखमांचा उल्लेख अहवालात नव्हता. हा उल्लेख डॉ. तावरे यांनीच गायब केला. शवविच्छेदन करण्याच्या अगोदर डॉ. दाभोलकर यांच्या मृतदेहाचे छायाचित्र काढण्यात आले होते. त्यात डॉ. दाभोलकर यांच्या मानेवर एक लांब केस दिसत होता. हा केस जेव्हा डॉ. अजय तावरे यांना न्यायालयात दाखवण्यात आला, तेव्हा त्यांनी हा केस नसून तो दोरा असल्याचे सांगितले. हा अत्यंत महत्त्वाचा असलेला पुरावा सांभाळून न ठेवता तो डॉ. अजय तावरे यांनी गायब केला.

४. डॉ. तावरे यांनी उलटतपासणीत न्यायालयात मान्य केले की, शवविच्छेदनाची जी नियमावली आहे, तिचे पालन करण्यात आले नाही. शवविच्छेदनाचे ‘व्हिडिओ चित्रीकरण’ करतांना ते सलग न करता प्रत्येक वेळी थांबवण्यात येत होते. हा निर्णय डॉ. अजय तावरे यांचा होता का ?, असा प्रश्‍न या निमित्ताने आता उपस्थित होत आहे.

५. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अन्य शक्यताही होत्या. शवविच्छेदन जर योग्य प्रकारे झाले असते, तर कदाचित् अन्वेषणात अन्य गोष्टीही समोर आल्या असत्या; मात्र डॉ. अजय तावरे यांच्या संशयास्पद शवविच्छेदन अहवालामुळे त्या समोर आल्या नाहीत. या गोष्टी डॉ. अजय तावरे यांनीच जाणीवपूर्वक नमूद न केल्याने या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट झाले, असेच म्हणावे लागेल.