संपादकीय : तिसरी शपथ अन् हिंदुत्वापुढील आव्हान !

९ जून या दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सलग ३ वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार वहाणारे नरेंद्र मोदी सलग तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार वहाणार आहेत. सलग ३ वेळा मुख्यमंत्री होऊन सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी एकमेव आहेत. मागील १० वर्षांच्या कार्यकाळापेक्षा पंतप्रधानपदाचा येणारा कार्यकाळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी पूर्वीपेक्षा कसोटीचा ठरणार आहे. यापूर्वी २ वेळच्या पंतप्रधानपदाच्या काळात एकट्या भाजपला बहुमत होते. या वेळी मात्र भाजप बहुमतात नाही. सत्तेत येण्यासाठी भाजपला तेलुगू देसम्, जनता दल (यु), शिवसेना, लोकशाही जनता पक्ष आणि अन्य काही पक्ष यांचे साहाय्य घ्यावे लागले आहे. यामध्ये हिंदुत्वाचा उघडपणे पुरस्कार करणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजप हिंदुत्वाचा प्रखरपणे पुरस्कार करणार का ? याची चिंता निश्चितच हिंदुत्वनिष्ठांपुढे आहे. या निवडणुकीत मुसलमान समाजाची एकगठ्ठा मते भाजपच्या विरोधात पडल्याचे प्रकर्षाने दिसून आले. मुंबईमध्ये केवळ महायुतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी मुसलमानांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवारांना मते दिली आणि महायुतीच्या उमेदवारांना पाडले. मुंबईमध्ये मतदान करणारा मुसलमान हा काही पारंपरिक मतदार नाही; परंतु केवळ नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत, यासाठी मुसलमानांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केले. याउलट हिंदूंची एकगठ्ठा मते भाजपला मिळाली नाहीत. याविषयी भाजपला निश्चितच विचार करावा लागेल. त्यामुळे येत्या काळात हिंदुत्वाचे सूत्र केवळ राजकीय पातळीपुरते मर्यादित न ठेवता धर्माधिष्ठित हिंदुत्वाचा पुरस्कार करणे, हे भाजपच्या हिताचे ठरेल. हिंदुत्वाचा पुरस्कार आणि दुसरीकडे हिंदूंमध्ये जागृती या दोन्ही स्तरांवर काम करणे, हे केवळ भाजपसाठीच नव्हे, तर समस्त हिंदूंसाठी हिताचे ठरेल. केंद्रामध्ये स्पष्ट बहुमत नाही, असे कारण देऊन भाजपला हे टाळता येणार नाही. त्यामुळे येत्या काळात हिंदुजागृतीचे हे शिवधनुष्य पेलणे, ही भाजपची कसोटी ठरणार आहे.

या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सरतेशेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदुत्वाविषयीची प्रखर भूमिका मांडली. यामध्ये ‘काँग्रेसने देशातील संपत्ती मुसलमानांना वाटली. काँग्रेसने इतक्या वर्षांत मुसलमानांचे लांगूलचालन केले’, असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून केला. दुसर्‍यांदा पंतप्रधान होण्याच्या काळात नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधून कलम ३७० हटवणे, अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे, तिहेरी तलाकचा कायदा रहित करणे, हे राष्ट्रहिताचे निर्णय घेतले; मात्र मागील १० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सरतेशेवटी हिंदुत्वाविषयीची थेट भूमिका प्रथमच मांडली; पण महायुतीच्या किती उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये हिंदुत्वाची ही प्रखर भूमिका मांडली, हे पहाणेही आवश्यक आहे.

हिंदुत्वविरोधी अपप्रचार खोडून काढा !

सौजन्य : Hindudwesha.org

भाजप असो वा शिवसेना हे दोन्ही पक्ष हे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारेच आहेत; मात्र ‘हिंदुत्वाचा पुरस्कार, म्हणजे धर्मांधता’, असे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. लोकसभेच्या प्रचारात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी हिंदुत्वाची सूत्रे मांडल्यावर त्यांच्यावरही हिंदु-मुसलमान वाद निर्माण करून मते मिळवण्याचा आरोप काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केला. जेव्हा जेव्हा हिंदुत्वाची सूत्रे मांडली जातात, तेव्हा तेव्हा ती मांडणार्‍यांना ‘धार्मिक तेढ निर्माण करणारे’ ठरवले जाते. हा अपप्रचार करणारे दुसरे तिसरे कुणी नाही, तर पुरोगामित्वाचा बुरखा पांघरणारे काँग्रेसधार्जिणे साम्यवादी आहेत. केंद्रामध्ये १० वर्षे भाजपची सत्ता असली, तरी या हिंदुविरोधी शक्तींचे प्राबल्य अद्यापही कायम आहे. अशा प्रकारच्या अपप्रचाराला हिंदू फसत आहेत. खरेतर काँग्रेसच्या मुसलमानधार्जिणेपणाची शेकडो उदाहरणे असतांना पुरोगामी मंडळी धर्मनिरपेक्षतेच्या नावाने हे खपवतात; मात्र हे सत्य मांडणार्‍या हिंदूंच्या नेत्यांना धर्मांध ठरवतात. भारतात मुसलमानांनी आतंकवाद्यांना आश्रय दिला, तरी ते धर्मांध ठरत नाहीत, तर अल्पसंख्यांक म्हणून त्यांच्याविषयीचे सहानुभूतीचे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जाते; मात्र हे सत्य सांगणार्‍यांना धर्मांध ठरवले जाते. ‘भाजपने ४०० च्या पुढे बहुमत मिळवल्यास राज्यघटना पालटणार’, असा अपप्रचार केला; मात्र काँग्रेसने मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी कितीतरी वेळा राज्यघटनेत पालट केला, हे मात्र पुढे आणले जात नाही. ही काही एक-दोन उदाहरणे नव्हेत, तर मागील अनेक वर्षे या देशात अशाच प्रकारे ‘नॅरेटिव्ह’ निर्माण करून बहुसंख्य हिंदूंच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना जाणीवपूर्वक निर्माण केली गेली आहे. याचा फटका केवळ भाजपलाच नव्हे, तर समस्त हिंदु समाजाला बसला आहे. येत्या काळात याविषयी प्रबोधन करणे क्रमप्राप्त आहे. हा विषय केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नाही, तर काँग्रेसच्या निर्मितीपासून चालू असलेले हे षड्यंत्र हिंदूंना संभ्रमित करण्यासाठी वापरले जात आहे. येणार्‍या काळात हिंदूंना धर्मांध, अत्याचारी ठरवणारा अपप्रचार खोडून काढून सत्य सर्वांपुढे मांडणारे धर्माधिष्ठित हिंदु विचारवंत आणि कृतीप्रवण धर्माभिमानी हिंदु निर्माण करणे, हे केवळ हिंदूच्याच नव्हे, तर राष्ट्राच्याही हिताचे ठरेल.

निवडणुकीच्या पलीकडे विचार व्हावा !

अयोध्येमधील श्रीराममंदिरामुळे भाजपची मते घटली नाहीत, तर जे मताधिक्य भाजपला मिळाले, ते अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे मिळाले, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश येथे हिंदूंनी भाजपच्या उमेदवारांना का निवडून दिले नाही ? यामध्ये स्थानिक पातळीवरील निर्णय आणि राजकारण यांकडे भाजपने लक्ष द्यायला हवे. भाजपच्या घटलेल्या मताधिक्याला मुसलमानांची भाजपविरोधी पडलेली एकगठ्ठा मते, महाराष्ट्रामध्ये पक्षफोडीचे राजकारण, चुकीच्या उमेदवारांची निवड आदी वेगवेगळी कारणे असू शकतात; मात्र हिंदुविरोधी मंडळी हिंदुत्वावर अपयशाचे खापर फोडून हिंदूंना संभ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा अपप्रचार रोखण्यास हिंदू न्यून पडत आहेत, याचा अभ्यास भाजपसह सर्वच धर्मप्रेमी हिंदूंनी करायला हवा. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर पुढच्या निवडणुकीत भाजपला याचा फटका बसेलच; पण याकडे भाजप किंवा अन्य हिंदूंनी केवळ निवडणुकीपुरते पहाण्याची चूक करू नये.

केंद्रात बहुमत नाही म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी हिंदुत्वाविषयी बोटचेपे धोरण स्वीकारले, तर पुरोगाम्यांच्या अपप्रचाराचे षड्यंत्र यशस्वी झाले, असे होईल. अशा वेळी संभ्रमित झालेल्या सर्वसामान्य हिंदूंना दिशादर्शन करण्याचे काम हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्षांसह सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी करणे आवश्यक आहे.

हिंदुविरोधी ‘नॅरेटिव्ह’ खोडून काढणे हे हिंदूंपुढील येत्या काळातील मोठे आव्हान !